मुंबई : गेल्या महिनाभरातील नाटय़मय घडोमाडींनंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने आज, शनिवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार असून, यानिमित्ताने शक्तिप्रदर्शनही केले जाईल. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणार असला तरी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा महाआघाडीने केला आहे.

काही गडबड होऊ नये म्हणून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाईल. हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कामकाजात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांची योजना आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि छोटय़ा पक्षांसह आघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची सुटका होईल. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

विश्वासदर्शक ठरावानंतर दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, राज्यपालांचे अभिभाषण असा कार्यक्रम मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडल्यावर विश्वासदर्शक ठराव मांडण्याची नियमात तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी अध्यक्षांच्या देखरेखीखाली विश्वासदर्शक ठराव मंजूर करावा, असा आदेश आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला दिला होता. या आदेशाच्या आधारेच हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर केला जाईल.

हंगामी अध्यक्ष बदलले :

साडेतीन दिवसांच्या देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. यानुसार राज्यपालांनी कोळंबकर यांना शपथ दिली होती. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हंगामी अध्यक्षपद भाजपकडे ठेवणे सत्ताधाऱ्यांना जोखमीचे वाटले. कारण हंगामी अध्यक्षाने गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घेतला किंवा आवाजी मतदानाने ठराव फेटाळल्याचे जाहीर केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. यातूनच हंगामी अध्यक्ष बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडीच्या नेत्यांनी घेतला. कायदेशीर तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यावर नव्या हंगामी अध्यक्षाच्या नावाची शिफारस करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाले. परंतु राज्यपाल मान्यता देतील का, असा प्रश्न होता. सकाळी हंगामी अध्यक्षपदी माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात आली आणि त्याला राज्यपालांनी मान्यता दिली. वळसे-पाटील यांनी लगेचच हंगामी अध्यक्षपदाचा पदभारही स्वीकारला. उद्या दुपारी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे’ असा ठराव सुनील प्रभू (शिवसेना), धनंजय मुंडे (राष्ट्रवादी), अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) हे मांडणार आहेत. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाईल.

फडणवीस विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेतेपदी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करावी, असे पत्र भाजपकडून सादर करण्यात आले. यानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा रविवारी केली जाईल.

अध्यक्षपदाबाबतच्या राष्ट्रवादीच्या ‘खेळी’ला विरोध

’ विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड करायची यावर काँग्रेसमध्ये खल सुरू होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्याची योजना होती. पण राष्ट्रवादीने वेगळीच खेळी केली.

’ १९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा अध्यक्षपदासाठी तीन नावांची यादी पाठविण्याची सूचना काँग्रेसने राष्ट्रवादीला केली होती. या वेळी राष्ट्रवादीने त्याचे उट्टे काढले.

’ अध्यक्षपदासाठी तीन आमदारांच्या नावांची यादी सादर करावी, या नावांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी चर्चा करेल. त्यानंतर नाव निश्चित केले जाईल, असे राष्ट्रवादीच्या खेळीचे स्वरूप आहे. पृथ्वीराज चव्हाण, वर्षां गायकवाड आणि के. सी. पाडवी या तीन नावांवर काँग्रेसमध्ये चर्चा आहे.

’ पृथ्वीराज यांच्या नावाला राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. तीन जणांची नावे राष्ट्रवादीने मागवल्याने काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया उमटली होती. महाआघाडी सरकारमध्ये सर्व निर्णय राष्ट्रवादीच्या कलाने घेऊ नका, अन्यथा सरकारचा कारभार चालणे कठीण जाईल, अशी भावना काँग्रेस आमदारांनी मल्लिकार्जुन खरगे आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे व्यक्त केली.