कारंजाची दुरुस्ती सुरू, मात्र गळतीचा शोध लागेना

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या फेब्रुवारीतील राज्य दौऱ्यापूर्वी फ्लोरा फाऊंटनचे लोकार्पण घाईगडबडीत उरकण्यात आले खरे, मात्र अवघ्या दोनच दिवसांत हे कारंजे बंद पडले आहे. कारंजातील पाण्याची पातळी खालावली असून, गळती नेमकी कुठून होत आहे, याचा शोध अद्याप पालिका अधिकाऱ्यांना लागलेला नाही.

मुंबईच्या वास्तुवैभवात भर टाकणाऱ्या आणि अभियांत्रिकी व शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या फ्लोरा फाऊंटनचे कारंजे २००७ पासून बंद होते. त्याच्या शिल्पांचेही बरेच नुकसान झाले होते. त्यामुळे पालिकेने २०१६ मध्ये फ्लोरा फाऊंटनला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी त्याच्या डागडुजीचा निर्णय घेतला आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.

फ्लोरा फाऊंटनचे पोर्टलॅण्ड दगडावर रंगकाम करण्यात आले होते. नूतनीकरणादरम्यान या शिल्पावरील रंगाचे थर गरम वाफांच्या साहाय्याने काढण्यात आले. दगडी शिल्पातील जलवाहिन्यांचा शोध घेऊन त्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर कारंजांची चाचणीही घेण्यात आली. दुरुस्तीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले.

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आदित्य ठाकरे फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे फ्लोरा फाऊंटनच्या लोकार्पणाचा सोहळा जानेवारीत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते धावपळीत उरकण्यात आला. २६ आणि २७ जानेवारी रोजी त्यातील कारंजी सुरू होती, मात्र पाण्याची पातळी खालावली. बाष्पीभवनामुळे पाणी कमी झाले असावे अशी शंका पालिका अधिकाऱ्यांना आली. मात्र पाण्याची पातळी सतत खालावतच होती. त्यामुळे कारंजाचे पंप बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ कारंजे बंद करण्यात आले. येत्या दोन दिवसांत गळतीचा शोध घेऊन दुरुस्ती करण्यात येईल आणि कारंजे सुरू केले जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

४० हजार लिटर पाणी

कारंजे सुरू करण्यासाठी त्यात ४० हजार लिटर पाणी साठविण्यात आले होते. मात्र एक-दोन तासांत पाण्याची पातळी एक सेंटीमीटरने कमी होत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पंप बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी ते बंद केले आणि तात्काळ गळतीचा शोध घेण्याचे काम हाती घेतले.