गणेशोत्सवात ६८५ टन पाने, दुर्वा आणि फुले
गणेशोत्सवात भाविकांनी गणरायाला अर्पण केलेली फुले, पाने, दूर्वाद्वारे निर्माण झालेल्या तब्बल ६८५ टन निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून एक महिन्यामध्ये या निर्माल्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. मुंबईमधील उद्यानांमधील वृक्षवल्लींसाठी या खताचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये १७ ते २७ सप्टेंबर या काळात साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवात ६८५ टन निर्माल्य तयार झाले. मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी २५६ निर्माल्य कलश उपलब्ध करण्यात आले होते. त्याचबरोबर निर्माल्य गोळा करुन खतनिर्मिती प्रकल्पांपर्यंत वाहून नेण्यासाठी १,१४६ टेम्पोंची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर विसर्जनस्थळी व आसपास साफसफाई करण्यासाठी अशासकीय संस्थांकडून सरासरी ६३१ कामगार तैनात करण्यात आले होते.
’६८५ टन निर्माल्य पालिकेच्या प्रशासकीय विभागांमधील खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. येत्या महिन्याभरात या निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती होईल आणि त्याचा वापर पालिकेच्या उद्यानांतील झाडांसाठी करण्यात येईल.

११ ऑक्टोबपर्यंत ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येईल. ‘स्वच्छ मुंबई – स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपटीवर ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. महापौर स्नेहल आंबेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह जयहिंद महाविद्यालय १०० , साबुसिद्धीक महाविद्यालय व ८०, विल्सन महाविद्यालयातील २० विद्यार्थी सहभागी झाले होते.