05 December 2020

News Flash

दसऱ्या दिवशी फुलांचा बाजार कडाडला

आवक घटल्याने दरात वाढ; झेंडू चारशे रुपये किलो

आवक घटल्याने दरात वाढ; झेंडू चारशे रुपये किलो

मुंबई : ऐन दसऱ्याच्या दिवशी बाजारात फुलांची आवक घटल्याने झेंडूचे दर चांगलेच वधारले. नेहमीच्या तुलनेत बाजारात फुलांची २५ टक्केच झेंडूच्या फुलांची आवक झाली. दुपापर्यंत झेंडूच्या फुलांचे दर किलोमागे ४०० रुपयांपर्यंत वधारले होते, तर लोकल सेवा बंद असल्याने आदिवासी बांधव आपटय़ाची पाने विक्रीसाठी घेऊन येऊ शकले नाहीत. परिणामी किरकोळ बाजारात आपटय़ांच्या जुडीमागे ग्राहकांना ५० ते ६० रुपये मोजावे लागत होते.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपनगर आणि शहरातील बहुतांश भागातील नागरिक दादर येथील फुलबाजारातून फुले खरेदी करतात. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दोन दिवस बाजारात फुलांची आवक मुबलक प्रमाणात झाली होती. मात्र ऐन दसऱ्याच्या दिवशी बाजारातील फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात घटली.

परिणामी किरकोळ बाजारात फुलांचे दर चांगलेच वधारले. किरकोळ बाजारात रविवारी सकाळी १५० ते २०० रुपयांदरम्यान असलेल्या झेंडूच्या फुलांचे भाव मालाच्या कमतरतेमुळे १२ वाजेपर्यंत ४०० रुपयांपर्यंत वधारले होते. ‘बाजारात फुलांची आवक घटल्याने त्यांचे दर वधारले आहेत. बहुतांश माल भिजलेला येत असल्याने त्यांना ग्राहक मिळत नाहीत. तर चांगल्या मालाची कमतरता असल्याने दरात वाढ झाली आहे,’ असे फुलविक्रेते सागर भोईर यांनी सांगितले. दसऱ्यानिमित्त आपटय़ाच्या पानांना विशेष मागणी असते. दरवर्षी लोकल रेल्वे गाडय़ांतून प्रवास करून वसई, विरार, पालघर, आसनगाव परिसरातून आदिवासी बांधव ही पाने घेऊन दादरच्या बाजारात दाखल होतात. करोनामुळे यंदा लोकल रेल्वे गाडय़ांतून प्रवासाची सर्वांना मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे आपटय़ांच्या पानांची तुलनेने कमी आवक झाली. त्याचबरोबर खाजगी वाहनांद्वारे आपटय़ाची पाने बाजारात दाखल झाल्याने प्रवासापोटी झालेल्या खर्चामुळे त्यांचे दरही चांगलेच वधारले होते. दादरच्या किरकोळ बाजारात मागील वर्षी १० ते २० रुपयांना मिळणाऱ्या आपटय़ाच्या पानांच्या जुडीसाठी ग्राहकांना ५० ते ६० रुपये मोजावे लागत होते.

‘मार्केटमध्ये ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, हिंगोली बाजारातून मालाची आवक होते. घटस्थापनेपासून अवकाळी पावसामुळे फुलांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा सुमारे ७० टक्के माल नष्ट झाला, तर बंगलोर परिसरात पडणाऱ्या पावसामुळे तेथून मालाची आवक घटली. दसऱ्याला बाजारात सुमारे ५० छोटे टेम्पो भरून फुले येत. मात्र रविवारी ५ ते ६ टेम्पो फुले आली. बाजारात १० टक्के फुलांची आवक झाल्याने त्यांच्या भावात वाढ झाली,’ अशी माहिती मीनाताई ठाकरे फुलमंडईचे अध्यक्ष मनोज पुंडे यांनी दिली

दादर बाजारातील रविवारचे फुलांचे दर

फुले                                     घाऊक बाजार              किरकोळ बाजार

कलकत्ता झेंडू                        १२० ते १५०                   ४०० रु

पिवळे गोंडे झेंडू                      १०० ते १२०                   ४०० रु

नामधारी झेंडू                          ८० ते १००

गुलछडी                                  २००                           ३०० रु

शेवंती                                     २०० ते २५०                 ३०० रु

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 2:26 am

Web Title: flower market boomed on occasion of dussehra zws 70
Next Stories
1 टीआरपी प्रकरणात प्रमुख आरोपीला अटक
2 मुंबईत वाहन खरेदीत वाढ
3 सोने खरेदीत घट
Just Now!
X