आवक वाढल्याने किमती ४०ते ५० टक्क्यांनी घसरल्या; दसरा-दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा

दसरा-दिवाळीचे वेध लागताच ग्राहकांच्या खिशाला चाप लावणाऱ्या फुलांच्या दरांना यंदा मुबलक पुरवठय़ामुळे ओढ लागली आहे. बाजारात फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक होत असल्याने सर्वात जास्त मागणी असलेल्या झेंडूसारख्या चढी मागणी असलेल्या फुलांचे दर ६० रुपये किलोवर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पूर्वी स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या फुलांच्या किमती उत्सवाच्या काळात मात्र वधारतात असे चित्र अनेकवेळा दिसून येते. यंदा मात्र फुलांचे उत्पन्न  चांगले झाल्याने मुंबईत फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे फुलांच्या किमती घसरल्याचा अंदाज व्यक्त  करण्यात येत आहे.

गणेशोत्सव काळात किलोमागे १२०-१५० रुपयांच्या घरात असलेले झेंडूची फुले या वेळीही भाव खाऊन जाणार असे वाटत असतानाच नवरात्रोत्सव काळात मात्र ही फुले अवघ्या ५० ते ७० रुपये किलोवर घसरली आहेत. नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यात ही फुलेही ताजी उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल या फुलांच्या खरेदीकडे असल्याचे दादर फूल बाजारातील फूल विक्रेता अब्दुल याने सांगितले. इतर फुलांमध्ये शेवंतीची किंमत गणेशोत्सवात १५०-२०० रुपये इतकी होती. तीही किलोमागे अवघी ८० रुपये इतकी झाली आहे. गणेश विसर्जनानंतर अवघ्या १५-२० दिवसांत फुलांच्या किमती तब्बल अध्र्यावर आल्या आहेत.

फुलांचे सध्याचे बाजारातील दर (किलो)

  • झेंडू ६० रुपये
  • शेवंती ८० रुपये
  • सरमिसळ फुले ८० रुपये
  • कमळ (दोन नग)२० रुपये
  • तेरडा ४० रुपये
  • वेणी २० रुपये

मी दरवर्षी सणांना फुलबाजारात खरेदीकरिता येत असतो. गणेशोत्सव काळात फुले खरेदी करण्यासाठी आलो असताना बाजारात फुलांचे दर प्रचंड वाढले होते. मात्र आता फुलांच्या किमती घसरल्याचे दिसून येत आहे.

– अक्षय सोलीम, ग्राहक