गणेशोत्सव आला की मुंबई शहर आणि उपनगरातील बाजारापेठा सजावटींच्या सामानांनी झगमगून जातात. यंदाही सजावटींच्या सामानांनी बाजारपेठा सजल्या असून देशी मालापेक्षा चिनी मालालाच वाढती मागणी आहे.सजावटीसाठी पर्यावरणस्नेही मखरांची चांगलीच गर्दी बाजारात दिसून येत आहे. मुंबईतील दादर, माटुंगा आदी परिसरात पर्यावरणस्नेही मखरांसाठीची स्वतंत्र दुकाने थाटण्यात आली आहेत. यापूर्वी थर्माकॉलच्या मखरांच्या जोडीला पर्यावरणस्नेही मखरांचे काही नमुने ठेवले जायचे. पण या मखरांची वाढती मागणी लक्षात घेऊन या वर्षी प्रथमच पर्यावरणस्नेही मखरांची स्वतंत्र दुकाने थाटण्यात आल्याचे दादर येथील एका दुकानदाराने स्पष्ट केले. यामध्ये बुकेसाठी वापरण्यात येणाऱ्या चटया, पडदे, लाकडी फळय़ा वापरून विविध प्रकारचे मखर तयार करण्यात आले आहेत. यात सिंहासनापासून कमळासारख्या मखरांचा समावेश आहे. काही दुकानांमध्ये तर नक्षीदार मंदिरेही दिसतात. दुकानात उपलब्ध असलेल्या मखरांसोबतच ग्राहक त्यांची कल्पना सांगून त्यांच्या इच्छेप्रमाणेही मखर बनवून घेऊ शकतो, असेही त्या दुकानदाराने स्पष्ट केले. या मखरांची किंमत साधारणत: १००१ पासून ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. तर थर्माकॉलच्या मखरांच्या किमतीही साधारणत: याच दरम्यान आहेत. मखरांसोबतच फुलांच्या सजावटीलाही मोठी मागणी असून यात खऱ्या फुलांना पर्याय म्हणून कापडी, कागदी आणि प्लास्टिकच्या फुलांच्या माळांना मागणी आहे. यापैकी कापडी फुलांच्या किमती या प्लास्टिक व कागदी फुलांच्या तुलनेत खूप जास्त असल्यामुळे सामान्य ग्राहक त्याकडे सहसा वळत नाहीत. तर कागदाच्या फुलांपेक्षा प्लास्टिकच्या फुलांना जास्त झळाळी असल्यामुळे ग्राहक याच फुलांच्या माळांना अधिक पसंती देत असल्याचे क्रॉफर्ड मार्केटमधील एका फूल विक्रेत्याने सांगितले. चिनी बनावटीच्या या सर्व फुलांच्या माळा, तोरणे अगदी ७० रुपयांपासून ते २५० रुपये प्रति सहा फूट या दरात उपलब्ध आहेत. याशिवाय ऑर्किड, जरबेरा, कान्हेरी या हुबेहूब खऱ्या फुलांसारख्या दिसणारी फुलेही बाजारात उपलब्ध आहेत. भारतीय गणेशभक्तांची गरज ओळखून चिनी उत्पादकांनी सजावटीसाठी एक साचाच बाजारात आणला आहे. हा साचा बांबूच्या साहाय्याने तयार करण्यात आला असून त्यावर विविधरंगी फुले लावण्यात आली आहेत. तसेच तो फोल्डिंगचा असल्यामुळे ठेवण्यासाठी जागाही फार कमी लागते. शिवाय हा साचा आपण आपल्याला पाहिजे त्या आकारात गणपतीच्या आजूबाजूला सजवून ठेवू शकतो. कॉफर्ड मार्केटच्या लगत असलेल्या लोहार चाळ परिसरातील विजेच्या दिव्यांच्या बाजारात विविध प्रकारचे लायटिंग तसेच दिवे उपलब्ध आहेत. अगदी १०० रुपयांपासून ते २५० रुपये मीटपर्यंतच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा बाजारात उपलब्ध आहेत. काही माळांचे रंग बदलण्यासाठी किंवा बंद व चालू करण्यासाठी रिमोट कंट्रोलही देण्यात आले आहेत. याशिवाय विविधरंगी फोकस आणि झुंबर या बाजारात लक्ष वेधून घेतात. इतर वेळांपेक्षा सणांच्या काळात बाजारातील वस्तूंच्या किमतींमध्ये ८ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याचे एका व्यावसायिकाने प्रामाणिकपणे मान्य केले.