गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांच्या दरांत आठवडाभरात दुप्पट, तिप्पट वाढ; मोगऱ्याला हजाराचा भाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजारात आवक वाढल्यामुळे ऐन श्रावण महिन्यात स्वस्त झालेली फुले गणेशोत्सवाच्या तोंडावर महाग झाली आहे. फुलांची आवक वाढली असली तरी, ग्राहकांची मागणीही वाढू लागल्याने फूलविक्रेत्यांनी किरकोळ बाजारात मनमानी दरांत विक्री सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात ४० रुपये किलोने विकला जाणारा झेंडू १२० रुपयांना तर तीन रुपयांना मिळणारे जास्वंदीचे एक फूल दहा रुपयांना विकले जात आहे.

श्रावणात फुलांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. त्यातही गणेशोत्सव आणि नवरात्रात ही मागणी वाढत असल्याने आवक ही वाढते. १५ ते २० दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात फुलांची मोठी आवक सुरू झाल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक होऊ लागला होता. त्यामुळे फुलांच्या दरांमध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र बदलले आहे. फूल विकेत्यांनी फुलांच्या व्रिक्री दरात वाढ केल्याने गणेशोनिमित्त फुलांची खरेदी करणाऱ्या गणेशभक्तांच्या खिशाला कात्री लागली आहे.

यंदा फुलांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. दादर आणि परळ येथील फूल  बाजारात दिवसाला सुमारे ५५ ट्रक भरून फुलांची आवक सुरू आहे. गणेशोत्सवामुळे ग्राहकांकडून फुलांना मागणी वाढू लागली आहे. यामध्ये झेंडू, शेवंती, मोगरा, जास्वंदी, गुलाब या फुलांना मोठी मागणी असून जुई, चमेली, आबोली या फुलांची मागणी वाढली आहे. याशिवाय सजावटीसाठी वापरण्यात येणारी जरबराच्या फुलांना देखील  ग्राहकांची पसंती आहे. सध्या दादरच्या फूल बाजारात गोंडय़ाच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. यातील पिवळा गोंडा हा १०० रुपये किलो तर केशरी आणि लाल  गोंडा १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. याच फुलांची किंमत गेल्या आठवडय़ात ४० रुपये किलो होती. याशिवाय गेल्या आठवडय़ात ८० रुपये किलो दराने विकली जाणारी शेवंतीची फुले मंगळवारी बाजारात २०० रुपये किलो दराने विकली जात आहे. याशिवाय जुई, तगर, आबोली, चमेली ही इवलीशी दिसणीऱ्या फुलांचा दर सध्या बाजारात  ८०० रुपये किलो आहे. गेल्या आठवडय़ापेक्षा दादर बाजारात गाडय़ांची आवक वाढली असल्याची माहिती फूल विक्रेते दिगंबर पवार यांनी दिली.

रानफुलेही बाजारात

कोवळ्या सुपाऱ्या, त्याचे कोंब, छोटी रानटी फुले, सुटय़ा लाल फुलांच्या पाकळ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. वसई ते डहाणू या पटय़ातील आदिवासी स्त्रिया ही रानफुले दादरच्या बाजारात विकत असल्याचे दिसत आहे. सुमारे ४० ते ५० रुपयांमध्ये या रानफुलांची विक्री केली जात आहे.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flowering rates in the mouth of ganeshotsav double triple increase in the week
First published on: 12-09-2018 at 05:02 IST