मुंबईत पंधरा लाख किलो फुलांची आवक ;  फुलांचे भाव १२० ते १६० रुपये प्रतिकिलो
’गणेशोत्सवानंतर थंड पडलेला बाजार नवरात्रोत्सवात हळूहळू जागा होऊ लागला. दसऱ्याच्या मुहूर्तावर तर सर्वच बाजारात चैतन्य परतले असून फूलबाजारही त्याला अपवाद नाही. खास दसऱ्यासाठी राखून ठेवलेल्या पिवळ्या केशरी फुलांच्या राशी चारही दिशांनी मुंबईच्या बाजारात दाखल झाल्या. फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली असली तरी त्यापेक्षाही जास्त मागणी असल्याने फुलांचे भाव दुपटीहून वाढले आहेत. मात्र दसऱ्यासारख्या मोठय़ा सणासाठी ग्राहकही हात सैल सोडून खरेदी करत आहेत.
सगळ्या सणांमध्ये ‘मोठा सण’ मानल्या जाणाऱ्या दसऱ्याची तयारी मुंबईकर जोरात करत असतात. साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या या मुहूर्तासाठी फुलांची आणि तोरणांची खरेदी करण्याची लगबग नेहमीच उडते. बुधवारीही दादरच्या फूलबाजारात एकच लगबग चालू होती. खास दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांनी भरलेले ३०० ट्रक मुंबईत दाखल झाले. दादरसोबतच बोरिवली फुलबाजारातही फुलांच्या राशी ओतल्या गेल्या. या फुलांसोबतच आपटय़ाची पाने, तोरणासाठी लागणारे आंब्याचे डहाळे आणि भाताच्या ताज्या लोंब्यादेखील दादरच्या फूलबाजारात मोठय़ा प्रमाणावर दिसत आहेत.
दसऱ्यानिमित्त होत असलेल्या प्रचंड फूलखरेदीची कल्पना असल्याने शेतकरी या दरम्यान फुले येतील, या पद्धतीने फुलशेती करतो. त्यामुळे यावेळी मोठय़ा प्रमाणात झेंडूची फुले येतात. यावेळीही खास दसऱ्यासाठी २०० ट्रक भरून माल दादरच्या फूलबाजारात आल्याची माहिती फूलव्यापारी पांडुरंग आमले यांनी दिली. एका ट्रकमध्ये पाच ते सहा टन या हिशेबाने तब्बल हजार ते बाराशे टन माल बाजारात आल्याचेही त्यांनी सांगितले. एक टन म्हणजे एक हजार किलो असा हिशेब केला असता दसऱ्याच्या निमित्ताने तब्बल १५ लाख किलो फुलांची विक्री दोन दिवसात संपूर्ण शहरात होत आहे. नेहमी ८० ते १०० रुपये किलो दराने चांगल्या दर्जाचा झेंडू उपलब्ध असतो. दसऱ्यासाठी मात्र त्याची किंमत दीडपट वधारली होती. सुटय़ा फुलांसोबतच झेंडूचे हार तसेच वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या माळाही बाजारात २० ते ६० रुपये प्रति मीटर भावात विकल्या जात होत्या. तीन माळा असलेल्या मोठय़ा तोरणाची किंमत १२० ते १५० रुपये प्रति फुटावर पोहोचली होती.