28 May 2020

News Flash

दादरमध्ये ‘नो पार्किंग’वरून भडका

दादरमधील २९ रस्त्यांवरील ६१ ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली असून या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून दादरमध्ये भडका उडाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

दादरमधील २९ रस्त्यांवरील ६१ ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली असून या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून दादरमध्ये भडका उडाला आहे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने हा प्रश्न सोडविण्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र तरीही हा प्रश्न ‘जैसे थे’च असून मनसेनेही त्यात उडी घेतली आहे.

मनसेचे नेते संदीप चव्हाण यांनी याबाबत ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तर शिवसेना नेते सदा सरवणकर आणि पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मध्यस्थी करीत ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयात रहिवाशांची बैठक आयोजित केली होती. वाहने उभी करण्यास मनाई केलेली काही ठिकाणे कारवाईतून वगळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर काही ठिकाणांबाबत पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन विशाखा राऊत यांनी दिले होते. मात्र हा प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’च आहे. या पाश्र्वभूमीवर रहिवाशांची एक बैठक शनिवारी ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयात आयोजित केली होती.

आचारसंहिता लागू असताना अशा पद्धतीने बैठक आयोजित करून पालिका अधिकारी सत्ताधाऱ्यांना मदत करीत असल्याची तक्रार मनसेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार संदीप देशपांडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अशी बैठक घेता येणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे शनिवारची ही बैठक पालिका अधिकाऱ्यांना रद्द करावी लागली.

बैठक रद्द करण्यात आल्यानंतरही अनेक रहिवाशी पालिका कार्यालयात आले होते. ‘नो पार्किंग’ विषयावर तातडीने तोडगा काढावा असा आग्रह रहिवाशांनी धरला. आचारसंहिता लागू असल्यामुळे या संदर्भात आता कोणतीही बैठक घेता येणार नाही वा त्यावर कोणताच निर्णय जाहीर करता येणार नाही, असे स्पष्ट करीत अधिकाऱ्यांनी रहिवाशांची मनधरणी केली. त्यानंतर रहिवाशी निघून गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2019 1:39 am

Web Title: fly from no parking in dadar abn 97
Next Stories
1 शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतरच पगार
2 ‘मॉब लिंचिंग’ शब्द परकीय, तरीही दलित व मुस्लिमांवर अत्याचार
3 परतीचा पाऊस जाता जाईना; ठिकठिकाणी दैना
Just Now!
X