मुंबई : राज्याच्या दुर्गम आदिवासी तसेच नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या भरारी पथकाच्या डॉक्टरांना टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करण्याबरोबर त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पथकाच्या डॉक्टरांना दिले.

आरोग्य विभागात १९९५ पासून नवसंजीवन योजनेअंतर्गत २८३ डॉक्टर भरारी पथकात काम करीत आहेत. अतिदुर्गम आदिवासी भागात काम करणाऱ्या या डॉक्टरांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत तसेच केवळ २४ हजार रुपये मानधनापोटी मिळतात. त्यातही आरोग्य विभागाकडून १८ हजार रुपये तर आदिवासी विभागाकडून सहा हजार रुपये देण्यात येतात. यातील आदिवासी विभागाकडून देण्यात येणारे सहा हजार रुपये अनेक महिन्यांपासून मिळाले नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मंत्रालयात या भरारी पथकाच्या डॉक्टरांबरोबर झालेल्या बैठकीत दहा वर्षे झालेल्या डॉक्टरांना सेवेत कायम करणे तसेच किमान पन्नास हजार रुपये मानधन देण्याची मागणी डॉक्टरांनी केली. नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याला दुप्पट वेतन दिले जाते. मात्र त्याच ठिकाणी काम करणाऱ्या भरारी पथकातील डॉक्टरांना केवळ २४ हजार रुपये मानधन दिले जाते, हा अन्याय असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे या भागात काम करताना डॉक्टरांचे मृत्यू झाले असून त्यांना विमा संरक्षण देण्याची मागणीही डॉक्टरांनी केली. आरोग्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टरांना टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करण्याबरोबर मानधनवाढ करण्याचे मान्य केले. याबाबत खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच डॉक्टरांना विमा संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले.

‘आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ करणार’

आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या कष्टाची आपल्याला कल्पना असून त्यांना सध्या मिळत असलेले मानधन हे तुटपुंजे आहे. या मानधनात समाधानकारक वाढ करू, असे स्पष्ट आश्वासन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. राज्यात सुमारे ६५ हजार आशा कार्यकर्त्यां व दहा हजार गटप्रवर्तक असून नुकतेच त्यांनी मानधनवाढीसाठी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. या आशा कार्यकर्त्यांच्या संघटनांशी मंत्रालयात एकनाथ शिंदे यांनी सखोल चर्चा करून त्यांचे प्रश्न समजावून घेतले. आशा कार्यकर्त्यांना जवळपास ७२ प्रकारची कामे करावी लागत असून त्यांना महिन्याकाठी केवळ साडेतीन हजार रुपये मानधनापोटी मिळतात.