गोरेगाव उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्यात
शिवसेना आणि भाजप यांच्याकडून करण्यात आलेले शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी एकमेकांना अलगद काढलेले चिमटे आणि त्या भाषणबाजीतही दडलेला युतीतील तणाव अशा वातावरणात शनिवारी गोरेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पण कार्यक्रम साजरा झाला. गोरेगावजवळील ओशिवरा रेल्वे स्थानकानजीक उभारण्यात आलेल्या या पुलाला समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे नाव देण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या पुलाला राम मंदिर उड्डाणपूल असे नाव देण्याची भाजपची मागणी होती. मात्र ‘हा आमचा निर्णय आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला या वेळी फटकारले. तर ‘उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत. ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या विरोधाच्या राजकारणास शालजोडीतून चपराक दिली.
गोरेगावच्या उड्डाणपुलाला राम मंदिर उड्डाणपूल असे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी केली होती. परंतु आपल्याला अयोध्येत राम मंदिर उभारायचे आहे. तेव्हा या उड्डाणपुलाच्या पुढील चौकाला राम मंदिर चौक असे नाव देऊ या, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मागणीची खिल्ली उडविली. या कार्यक्रमास शिवसेना आणि भाजपच्या कार्यकत्र्र्यानी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी देऊन हा परिसर दणाणून सोडला. मुंबईचे रखडलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप युती सरकार करीत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांची सागरी मार्गाची संकल्पना खूप चांगली आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना सागरी मार्ग प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून परवानगी आणता आली नाही. पण ती आम्ही एका वर्षांत आणली. युतीचे सरकार गतिमान सरकार आहे. त्यायोगे आम्ही मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकू.’ उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत. ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत आपण काम करीत आहोत. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता दुप्पट करण्याचा विचार आहे. तर सध्या आर्थिक स्थिती डळमळीत झालेल्या बेस्ट उपक्रमाच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. भविष्यात रेल्वे, मोनो, मेट्रो आणि बेस्टसाठी एकच तिकीट असेल. हे तिकीट मोबाइलवरही उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे उत्तम मार्गदर्शन करतात
मुंबईचे रखडलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप युती सरकार करीत आहे. उद्धव ठाकरे हे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत. ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पुलाच्या नामकरणाचा निर्णय आमचाच..
गोरेगावच्या उड्डाणपुलाला राम मंदिर उड्डाणपूल असे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी केली होती. मात्र या पुलाच्या नामकरणाचा निर्णय आमचाच आहे.
– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख