उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : पालघरमध्ये करोना रुग्णांना रुग्णशय्या आणि अन्य वैद्यकीय सुविधांअभावी जमिनीवरच झोपवावे लागत असल्याची बाब समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने त्याची बुधवारी गंभीर दखल घेतली व मुंबईपासून जवळ असलेल्या पालघरमध्ये हे चित्र असेल तर अन्य ग्रामीण भागांत काय स्थिती असेल असा प्रशद्ब्रा उपस्थित करत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने आता ग्रामीण भागांतील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकडे लक्ष केंद्रीत करावे असे सांगून त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्याचे स्पष्ट केले.

करोना उपचारांतील गैरव्यवस्थापनाबाबतच्या याचिकांवर सध्या मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. त्या वेळी न्यायालयाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीने पालघरमधील करोना रुग्णांच्या दयनीय स्थितीबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा दाखला दिला. पालघर मुंबईपासून काही किमी अंतरावर आहे आणि तेथे करोना रुग्णांसाठी काहीच सुविधा नसल्याचे यावृत्तात दाखवण्यात आलेले चित्र विदारक आहे. पालघरची ही स्थिती असेल तर अन्य ग्रामीण भागांतील स्थिती काय असेल, असा प्रश्न न्यायालयाने केला.

ठाणे जिल्ह्यातही अनेक आदिवासी पाडे आहेत. वार्तांकन करताना घेण्यात आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाखतींमधून तेथील आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था समोर आली आहे. पालघरबाबतचे हे वृत्त म्हणजे डोळ्यात अंजन घालणारी घटना म्हणून सरकारने त्यातून धडा घ्यावा व ग्रामीण भागांतील करोनास्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आतापर्यंत आपण शहरी मुंबई महानगर प्रदेशातील करोनास्थिती सुधारण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले. आता ग्रामीण भागांतील स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले.

शहरांतील करोनास्थिती नियंत्रणात आणण्यात तुम्हाला यश आले आहे. तेथे आवश्यक ती आरोग्य व्यवस्था, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. ग्रामीण भागांसाठी हे करण्यात आलेले नाही. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या वाढत असलेला ग्रामीण भाग आता सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. पहिल्या लाटेत ग्रामीण भागात फार प्रसार नव्हता परंतु यावेळी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. तेथील प्रत्येक रुग्णाला उपचार मिळायला हवेत, असेही न्यायालयाने म्हटले.