लोककला, लोकसंगीत आणि लोकनाटय़ातून संपूर्ण महाराष्ट्राची ‘स्वरधारा’ बनलेले शाहीर साबळे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शाहिरांचे पुत्र देवदत्त साबळे यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी सामाजिक, राजकीय, शाहिरी, लोककला आदी क्षेत्रातील मंडळी तसेच शाहिरांचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शुक्रवारी दुपारी शाहीर साबळे यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या परळ येथील निवासस्थानी निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर निवासस्थानापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. परळ येथून निघालेली अंत्ययात्रा शिवाजी मंदिर, दादर येथे आली, तेव्हा ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते अंकुश चौधरी यांनी येथे साबळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रा शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचली. शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी साबळे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहिले.
या वेळी खासदार रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, अ‍ॅड. आशीष शेलार,  छगन भुजबळ  बाळा नांदगावकर, अभिनेते आदेश बांदेकर, भरत जाधव, रमेश भाटकर, जयवंत वाडकर आदी उपस्थित होते.