टाळेबंदी वाढवण्यात कोणालाच आनंद नाही. पण त्यासाठी कडक शिस्त पाळून करोनाची साथ नियंत्रणात आणण्याकरिता लोकांनी सहकार्य करावे लागेल. शिस्त पाळली नाही आणि गर्दी होत राहिली तर टाळेबंदी वाढवावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाजमाध्यमाच्या थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील लोकांशी संवाद साधला. राज्यात ठिकठिकाणी टाळेबंदीत शिथिलता दिली आहे. सुरक्षित अंतर पाळून, मुखपट्टी (मास्क) आदी वैयक्तिक सुरक्षेची साधने वापरून लोकांनी करोनानियंत्रणासाठी सहकार्य केले पाहिजे. पण गर्दी झाली तर पुन्हा सारे काही ठप्प होईल. टाळेबंदी वाढवण्यात कोणालाच आनंद नाही. पण सध्या ती एक गरज आहे. लोकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, आपल्याला करोनाची साखळी तोडायची आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडल्यावर सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे. शिस्त बिघडणे म्हणजे टाळेबंदी वाढणे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पोलीस यंत्रणा सतत काम करत आहे. त्यांच्याशी कुणी हुज्जत घालू नये. त्यांच्याशी गैरवर्तन केल्यास खपवून घेणार नाही. काही ठिकाणी पोलीस यंत्रणेला थोडी विश्रांती देण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सुरक्षा बल पुरवण्याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत. उपलब्ध मनुष्यबळानुसार पोलीसांना विश्रांती दिली जाईल.

औरंगाबादजवळ मालगडीच्या धडकेने परप्रांतीय मजूर ठार झाल्याच्या घटनेबद्दलही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दु:ख व्यक्त के ले. रेल्वे सोडण्याबाबत अफवा पसरत आहेत. पण मजुरांनी अफवांना बळी पडू नये. रेल्वे सोडण्याबाबत काहीही निर्णय असला तरी त्याची माहिती योग्यरितीने मिळेल.

मुंबईत लष्कर बोलावण्याची गरज नाही : मुंबईत लष्कराला पाचारण करणार ही एक अफवाच आहे. लष्कर बोलावण्याची काहीच गरज नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘ढिसाळ कारभार सहन करणार नाही’

डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील मंडळी खूप चांगले काम करत आहेत. मात्र, काही रुग्णालयात ढिसाळ कारभाराच्या तक्रारी आल्या आहेत. ते सहन करणार नाही. दप्तरदिरंगाईपण सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बजावले.