मुंबई : राज्यात सर्वधर्मीयांनी आपापले सण साजरे करताना स्वयंशिस्त पाळल्याने तसेच सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे करोनावर नियंत्रण आणता आले. मात्र धोका अजून टळलेला नसून लस आली तरी पुढचे सहा महिने सावध राहण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लोकांनी मुखपट्टी वापर व सुरक्षित अंतर याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते. करोना संकटाशी निग्रहाने लढा देत असतांना अनेक विकासकामांना वर्षभरात गती दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. राज्यातील प्राचीन मंदिरांचा, तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे राज्य शासनाने ठरवले असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वधर्मीयांनी आपापल्या सणसमारंभात शिस्त पाळल्याने आणि जनतेने स्वयंशिस्तीचे पालन केल्याने आपण करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलो आहोत. पण अजून करोनाचा धोका टळलेला नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लस आली तरी पुढचे सहा महिने आपल्याला सावध राहण्याची, मुखपट्टी वापरणे, हात धुणे आणि अंतर नियम पाळण्याची गरज आहे.