मत्स्यव्यवसाय महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाकडेच

मुंबई : मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधान परिषदेत दिली. नागपूरला मत्स्यव्यवसाय विद्यापीठ स्थापन करण्यात आले असले तरी कोकणातील शिरगाव येथील मत्स्यव्यवसाय महाविद्यालय व संशोधन केंद्र कोकण कृषी विद्यापीठास संलग्न ठेवण्याची कायदेशीर तरतूद करणारे विधेयक विधानपरिषदेत बुधवारी एकमताने संमत करण्यात आले.

नागपूरला मत्स्यव्यवसाय विद्यापीठ सुरू करण्यात आल्यावर त्या कायद्याअंतर्गत शिरगावचे महाविद्यालय व संशोधन केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न ठेवण्यात कायदेशीर अडचणी होत्या. हे केंद्र नागपूरला हालविणार, अशाही चर्चा झाल्या. पण विदर्भात मत्स्यव्यवसाय संशोधन केंद्र स्थलांतरित करण्यास कोकणातील राजकीय नेत्यांचा व जनतेचा विरोध होता.

गेल्या तीन-चार वर्षांत सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्याने त्या वैध आहेत किंवा नाही, याविषयीही संदिग्धता होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी कोकणातील महाविद्यालय व संशोधन केंद्र कोकण कृषीविद्यापीठातच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला व तशी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.