ठाणे विभागामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून साडेचार कोटींचा माल जप्त

‘संवेदनशील दातांसाठी चोवीस तास संरक्षण, वैद्यकीयदृष्टय़ा प्रमाणित’ असे टूथपेस्टच्या टय़ूबवर किंवा आवरणावर लिहिलेल्या दाव्यांना भुलून त्याचा वापर करत असाल तर सावधान! असे वैद्यकीय दावे करणाऱ्या कोलगेट आणि सेन्सोडाईन या बॅ्रण्डच्या टूथपेस्टवर ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अशा दाव्यांनी लोकांची दिशाभूल केली जात असल्याने सुमारे साडेचार कोटीचा माल प्रशासनाने जप्त केला आहे.

ठाणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी परिसरातून २९ मार्च रोजी वैद्यकीय दावे करणाऱ्या कोलगेट आणि सेन्सोडाईन ब्रॅण्डची उत्पादने जप्त केली. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याअंतर्गत ‘टूथपेस्ट’ या उत्पादनाला ‘सौंदर्यप्रसाधने’ या वर्गाखाली परवाना दिला जातो. त्यामुळे या टूथपेस्टना वैद्यकीय प्रमाणित किंवा संवेदनशील दातांसाठी सुरक्षित असा दावा करण्याची कायद्याने परवानगी नाही. डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या काही विशिष्ट टूथपेस्टना ‘औषधे’ म्हणून प्रमाणित केले जाते. त्यांनाचा असा दावा करण्याची परवानगी आहे.

‘कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेड’च्या ‘कोलगेट अ‍ॅण्टिकॅव्हिटी सेन्सिटीव्ह’ या उत्पादनाच्या वेष्टनावर संवेदनशील दातांसाठी चोवीस तास संरक्षण, वैद्यकीयदृष्टय़ा प्रमाणित असे वैद्यकीय दावे केल्याचे आढळले. सुमारे ४१ लाख ८६ हजारांचा माल जप्त केला आहे.

‘ग्लॅस्को स्मिथलाईन कन्झ्युमर (जीएसके) हेल्थ लिमिटेड’च्या ‘सेन्सोडाईन विथ फ्लुराईड’, ‘सेन्सोडाईन फ्लुराईड फ्रेश जेल’ या दोन उत्पादनांचा सुमारे ४ कोटी २७ लाखांचा माल जप्त करण्यात आला. या उत्पादनांच्या वेष्टनावर दुरुस्ती आणि संरक्षण, संवेदनशील दातांना दररोज संरक्षण, वैद्यकीयदृष्टय़ा प्रमाणित असे दावे केलेले आढळले. एकूण ४ कोटी ६९ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती ठाणे, कोकण विभागाचे सहआयुक्त विराज पौनिकर यांनी दिली.

‘दर्जाबाबत शंका नाही’

जप्त केलेल्या उत्पादनांच्या दर्जाबाबत शंका नाही. मात्र सौंदर्यप्रसाधने म्हणून परवानगी दिलेली असताना वैद्यकीय दावे करणे कायद्याचे उल्लंघन आहे. या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठविलेली असून त्यांनी प्रत्युत्तरही दिलेले आहे. परंतु ते समाधानकारक नसल्याने पुढील कारवाई प्रशासनाकडून केली जाणार आहे. न्यायालयामध्येही हे प्रकरण लवकरच दाखल केले जाईल, असेही पुढे पौनिकर यांनी सांगितले.

दर्जाच्या पुर्ततेचा कोलगेटचा दावा

कोलगेटची सेन्सिटिव्ह टुथपेस्ट ‘द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्टस’ने ठरवून दिल्याप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाने नेमून दिलेल्या दर्जाची पूर्तता करत आहे. दाव्याशी निगडित कागदपत्रे, कायदेशीर परवाना इत्यादी माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिलेली आहे. प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक माहिती देण्यासाठी आम्ही पूर्णपणे मदत करत आहोत, असे कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेडच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

मानकांचे पालन-जीएसके

ग्राहक सुरक्षा आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. आमची सर्व उत्पादने राष्ट्रीय गुणवत्तेच्या मानकांनुसार उत्पादित केली जातात आणि त्या मानकांचे कठोर पालन केले जाते. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष दिले जात आहे, असा दावा जीएसके कन्झ्युमर हेल्थ केअरच्या अधिकृत प्रवक्त्यांनी केला आहे.