08 April 2020

News Flash

खाद्यपदार्थ पोहचवणारे अ‍ॅप अडचणीत?

पुरवठा आकाराच्या मुद्दय़ावरून राज्यभरातील तीन हजार हॉटेलांकडून करार रद्द

(संग्रहित छायाचित्र )

गेल्या एकदीड वर्षांत स्विगी, झोमॅटो यांसारखे अ‍ॅप वापरून विविध हॉटेल्समधून घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवण्याची सेवा लोकप्रिय झाली असली तरी या सेवेशी जोडून घेणाऱ्या रेस्तराँ, उपाहारगृहे आणि त्यांचे खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे अ‍ॅप आधारित सेवा पुरवठादार (फूड सव्‍‌र्हिस अ‍ॅग्रीगेटर – एफएसए) यांच्यामध्ये वाद उफाळला आहे. हॉटेल्सच्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत राज्यातील सुमारे तीन हजार हॉटेल्सनी एफएसएशी करार रद्द केले आहेत.

हॉटेलमधील खाद्यपदार्थ, ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एफएसए ग्राहकांकडून पुरवठा आकार (डिलिव्हरी चार्जेस) घेत असतात. तसाच पुरवठा आकार हॉटेल मालकांकडूनदेखील घेत असल्याचा मुख्य आरोप ‘फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’कडून केला जात आहे. ‘अशा प्रकारे दुहेरी आकार वसूल करणे एफएसएंनी त्वरित थांबवणे गरजचे असल्याचे, फेडरेशनचे प्रवक्ते दिलिप दतवाणी यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांना जसा फटका बसतोय तसाच फटका हॉटेल्सनादेखील बसत असल्याचे ते सांगतात.

अ‍ॅप आधारित खाद्यपदार्थाची सेवा मिळू लागल्यानंतर हॉटेल्स नवीन ग्राहकांमध्ये वाढ झाल्याचे हॉटेल मालक मान्य करतात. तसेच खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी मनुष्यबळ, वाहन याची व्यवस्था करायचा खर्च कमी झाल्याचे ते सांगतात. मात्र त्यानंतर अनेक सवलती, पुरवठा आकार यामुळे एफएसएची सेवा हॉटेल्सना परवडत नसल्याचे फेडरेशनचे उपाध्यक्ष गुर्बक्षिसिंह कोहली यांनी सांगितले. अवास्तव, न परवडणाऱ्या आणि अवाजवी सूट देण्याच्या या पद्धतीमुळे ही सेवा त्रासदायक ठरत असल्याचे फेडरशेनचे म्हणणे आहे. तसेच ग्राहकांची माहिती एफएसएकडून हॉटेलना मिळत नसल्याची संघटनेची तक्रार आहे.

अ‍ॅप आधारित सेवा पुरवठादार प्रत्येक हॉटेलशी करार करतात. मात्र या करारात अनेकदा त्रुटी दिसतात, सर्वच हॉटेलशी एकसारखा करार करण्याची मागणी फेडरेशनकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर एखाद्या विशिष्ट योजनेच्या अंतर्गत स्वतंत्र करार केले जातात, त्यामध्ये एखाद्या विशिष्ट परिसरातील ठरावीक हॉटेल्सना प्राधान्य दिले जाते. मात्र कालांतराने हीच सुविधा त्याच परिसरातील इतर हॉटेल्सनादेखील कमी खर्चात उपलब्ध होते. या सर्व घटनांमुळे एफएसएच्या सेवांबाबत हॉटेल मालकांमध्ये रोष उत्पन्न झालेला दिसून येत आहे. तसेच एफएसएंना २५ टक्के इतके कमिशन देणे यापुढे शक्य नसल्याचे फेडरेशनचे मत आहे.

स्विगी, झोमॅटोसारख्या सुविधा अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या असून, ग्राहकांना दूरच्या हॉटेलमधूनदेखील खाद्यपदार्थ मागवण्याची सोय झाली आहे. त्यामुळे ठरावीक एखाद्या भागातच सुविधा पुरवण्याचे अथवा अमुक एका किमतीची खरेदी करण्याचे बंधन नसल्यामुळे ग्राहकांसाठी या सुविधा फायदेशीर ठरल्या आहेत. किंबहुना त्यामुळे हॉटेल मालकांची अरेरावी यामुळे बंद झाल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. या पाश्र्वभूमीवर सध्या उफाळलेला वाद पाहता त्यावर तोडगा न निघाल्यास ते अंतिमत: ग्राहकांसाठी तोटय़ाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 1:36 am

Web Title: food delivery app in trouble abn 97
Next Stories
1 मरिन ड्राइव्हचे दर्शन घडवणाऱ्या गॅलरीसाठी शुल्क
2 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘गणेश गौरव स्पर्धा’
3 व्यावसायिक इमारती अपंगस्नेहीच हव्यात!
Just Now!
X