27 May 2020

News Flash

भाजपच्या वतीने दररोज २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य, भोजन

आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन देणार

संग्रहित छायाचित्र

 

राज्यभरात दररोज २० लाख गरजू नागरिकांपर्यंत अन्नधान्य अथवा भोजन पोहोचविण्याचा निर्णय भाजपने शुक्रवारी घेतला. अन्यही अनेक उपाययोजना व मदतकार्य पक्षाकडून केले जाणार आहे. राज्यातील भाजपचे सर्व आमदार- खासदार पक्षाच्या मदतनिधीला एक महिन्याचे वेतनही देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसरचिटणीस व्ही. सतीश, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पक्षाचे राज्यातील सर्व खासदार-आमदारांची ऑडिओ ब्रिज यंत्रणेने बैठक झाली.

केंद्र सरकारकडून निर्णयांची अपेक्षा असलेल्या बाबींमध्ये गडकरी व जावडेकर हे पाठपुरावा करणार आहेत. वस्तूंचा काळाबाजार रोखणे आणि इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या मदतीने सॅनेटाइझरची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता करून देणे, यासाठी गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. शेतीमाल व फळे बाजारात पोहोचविण्यासाठी भाजप नेते पोलिसांशी समन्वय साधत आहेत. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स यांना मास्क, गाऊन अशी ५००० हेल्थ किट पुरविली जातील. रक्तदान शिबिरांसाठी काही आमदारांनी पुढाकार घेतला आहे. आणखी काही रुग्णालये विलगीकरणासाठी निश्चित करून त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनेटायझर आणि हँडग्लोव्हज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले १.७० लाख कोटींचे पॅकेज आणि बँका आणि वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते पुढचे तीन महिने लांबणीवर टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला आहे. त्याचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले. पोलीस दलावरील ताण कमी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांची सर्व सुरक्षाव्यवस्था परत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:22 am

Web Title: food grains and food for the bjp up to 20 lakh people every day abn 97
Next Stories
1 सिद्धिविनायक न्यास रक्तदानासाठी तुमच्या दारी
2 गाडय़ा जमा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
3 राज्यातील सर्व अपंगांना एक महिन्याचे अन्नधान, आरोग्य साहित्य घरपोच करणार
Just Now!
X