अन्न सुरक्षा कायद्याच्या विरोधात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले असले तरी या विधेयकाला सर्वच मित्र पक्षांचा पाठिंबा असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पवार यांनी मसुद्याला पाठिंबा दिल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी शुक्रवारी सांगितले.
कर्नाटकातील विजयाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दिशा मिळाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला असेच यश मिळेल, असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या यशाने हुरळू नका, असा सल्ला पवार यांनी दिल्याकडे लक्ष वेधले असता तिवारी यांनी, देशात काँग्रेसच स्थिर सरकार देऊ शकते हा संदेश गेला आहे. तसेच भाजपच्या दुटप्पी धोरणाला जनतेने चांगलीच चपराक दिली आहे. देशातील गोरगरीबांना स्वस्तात धान्य देण्याच्या उद्देशानेच मांडण्यात आलेल्या अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध करून भाजपने आपला चेहरा दाखवून दिला आहे. भाजपच्या विरोधाने हे विधेयक मंजूर होऊ शकले नसले तरी या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता अध्यादेश काढण्याचा पर्याय खुला असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.