दारिद्रय़ रेषेखालील नागरिकांसाठी केंद्र सरकारने वाजतगाजत अन्नसुरक्षा योजना अंमलात आणली खरी पण पोट भरण्याची मारामार असलेल्या गरीब, गरजू आणि आदिवासी कुटुंबांना इंग्रजी मात्र उत्तम येत असल्याचे ‘ज्ञान’ सरकारी कारभारातून पाजळत असल्यामुळे पनवेल तालुक्यातील शिधावाटप दुकानांवर स्वस्त अन्न मिळविण्याआधी इंग्रजी यादीतले नाव वाचण्यासाठीच रांगा लांबत चालल्या आहेत!
आधारकार्डानुसार अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही अन्नसुरक्षा योजना लागू झाली आहे. त्यातील अनेक त्रुटी मात्र चव्हाटय़ावर येत आहेत. उरण भागात काही उच्चभ्रू कुटुंबांचा या यादीत समावेश असल्याचे प्रकरण ताजे असताना आता लाभार्थीच्या याद्या इंग्रजीत आल्याने नवाच गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे ही यादी आडनावांच्या आद्याक्षरानुसारही नसल्याने ज्याला इंग्रजी येते, त्यांनाही शेकडो नावे बारकाईने तपासण्याचा ‘वाचनानंद’ वचनबद्ध सरकारपायी लाभत आहे. या योजनेअंतर्गत प्रति माणशी तीन किलो तांदूळ ३ रुपये दराने आणि गहू प्रति माणशी दोन किलो हे दोन रुपये दराने वाटप होणार आहे. पनवेल तालुक्यातील सुमारे दोनशेहून अधिक रास्त धान्य भावांच्या दुकानांवर त्यामुळे सध्या गरिबांची झुंबड उडाली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका सुशिक्षित व्यक्तीला आधी गाठावे लागण्याची पाळी या कुटुंबांवर आली आहे. पुरवठा विभागाने या यादीतील लाभार्थीची नावे मराठीतून प्रसिद्ध करावी, अशी मागणी पनवेल शहर मनसेने केली आहे. पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.