मुंबई : ‘मुंबई चोवीस तास’ ही संकल्पना राबवल्यानंतर आता पालिकेने पर्यटनस्थळी बंदिस्त गाडीतून खाद्यपदार्थ देणारे ‘फूड ट्रक’ उभे करण्याची परवानगी देण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पालिका धोरण तयार करीत असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, काळा घोडा, वरळी समुद्रकिनारा अशा मोजक्या ठिकाणी हे फूड ट्रक लावता येणार आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री बाहेर असणाऱ्यांना रस्त्यावर खादाडी करायची असल्यास त्यांचीही इच्छा पूर्ण होणार आहे.

‘मुंबई चोवीस तास’ या संकल्पनेअंतर्गत मोठमोठी उपाहारगृहे सुरू राहणार आहेत. मात्र आता रस्त्यावरच्या फूड ट्रकनाही परवानगी देण्याचा विचार पालिका करीत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे खाद्यपदार्थाचे स्टॉल रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी सुरू असतात व ते चालतातही. त्यामुळे रात्रीच्या वेळेत अशा खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाडय़ांची गरज आहे हे ओळखून पालिकेने या फूड ट्रकना अधिकृतपणे परवानगी देण्याचे ठरवले आहे. त्याकरिता धोरण तयार करण्यात येणार असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मांडता येणार आहेत. या संकल्पनेमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी स्वस्तात चांगले अन्न मिळेल अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.