News Flash

नवीन वर्षांत ३५ पादचारी पुलांच्या कामांचा ‘भार’

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पादचारी पुलांची कामे धीम्या गतीने

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पादचारी पुलांची कामे धीम्या गतीने

मुंबई : गोखले आणि हिमालय पुलांच्या दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकाचवेळी ३५ नव्या-जुन्या पादचारी पुलांची कामे हाती घेतल्याने नवीन वर्षांत या पुलांच्या कामांचा भार प्रवाशांना सोसावा लागणार आहे.

पश्चिम रेल्वेवर १९ पादचारी पुलांची कामे सुरू आहेत. यातील माहीम, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी येथे एकापेक्षा जास्त पादचारी पुलांची कामे सुरू आहेत. माहीम स्थानकात दोन (दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला), वांद्रे स्थानकात तीन (दक्षिण, उत्तर आणि मध्यभागी), सांताक्रूझ स्थानकात दोन (दक्षिण दिशेला आणि मध्यभागी), अंधेरी स्थानकात दोन पुलांची (दक्षिण आणि उत्तर दिशेला) कामे सुरू आहेत. मध्य रेल्वेवर १५ पादचारी पुलांची कामे सुरू आहेत. तर नाहूर आणि पनवेल स्थानकात दोन पुलांचे विस्तारीकरण सुरू आहे. दुसरीकडे विक्रोळी, ठाणे, कोपर, डोंबिवलीसह अन्य काही गर्दीच्या स्थानकातील पुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.

प्रभादेवी स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मार्च २०१८ मध्ये पुलांच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले. मात्र पुलांची कामे धीम्या गतीनेच होत आहेत. त्यातच यंदा पाऊस जास्त काळ रेंगाळल्याने, तांत्रिक अडचणी व निविदा काढण्यास झालेल्या विलंबामुळे पुलांच्या कामांना म्हणावी तशी गती मिळालेली नाही. काही स्थानकांत नवीन पुलांचे काम आणि जुन्या पुलांची दुरुस्ती अशी कामे एकाच वेळी घेण्यात आल्यानेही नवीन वर्षांत ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेबरोबरच एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) स्थानकांत पादचारी पूल उभारले जात आहेत. जुना पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारले जात आहेत. नव्याने पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय जुन्या पुलांची दुरुस्तीही सुरू आहे. दुरुस्तीमुळे एका पुलाचा दुसऱ्यावर पडणारा ताण, त्यात फलाटावरच पुलाचे बांधकाम साहित्य असल्याने कित्येक स्थानकांवर गर्दीच्या वेळी आणीबाणीची परिस्थिती उद्भवते.

मध्य रेल्वेवर २०२०मध्ये सेवेत येणारे पूल

कसारा, विक्रोळी, डोंबिवली, ठाकुर्ली, उल्हासनगर, शिवडी, आंबिवली, नाहूर (विस्तारीकरण), पनवेल (विस्तारीकरण), टिटवाळा, कोपर, अंबरनाथ (दोन पूल), बदलापूरमधील पूल २०२०मध्ये सेवेत आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ठाणे स्थानकातील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे कामही या वर्षांत पूर्ण होईल.

पश्चिम रेल्वेवरील पुलांची कामे

मरिन लाइन्स (उत्तर दिशेला), गॅ्रण्ट रोड (दक्षिण दिशेला), मुंबई सेन्ट्रल (दक्षिण दिशेला), दादर (दक्षिण दिशेला), माहीम (दक्षिण दिशेला स्कायवॉकला जोडणार), माहीम (उत्तर दिशेला), वांद्रे स्थानकात तीन पूल (दक्षिण, उत्तर आणि मध्यभागी), खार (दक्षिण दिशेला), सांताक्रूझ स्थानकात दोन (दक्षिण दिशेला आणि मध्यभागी), गोरेगाव (दक्षिण दिशेला), अंधेरी स्थानकात दोन पूल (दक्षिण आणि उत्तर दिशेला), मालाड (दक्षिण दिशेला पूल आणि स्कायवॉक), दहिसर (मध्यभागी), नायगाव (उत्तर दिशेला), बोईसर (उत्तर दिशेला)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:16 am

Web Title: foot over bridges work slow on the central and western railway zws 70
Next Stories
1 मुंबईत गारवा
2 नव्या वर्षांत मुंबईत म्हाडाची फक्त ५९ घरे!
3 अर्ध वातानुकूलित लोकलच्या चाचणीवर शिक्कामोर्तब
Just Now!
X