रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) १५ ठिकाणी १७ पादचारी पूल बांधणार आहे.

मध्य रेल्वेवरील १२ ठिकाणी, पश्चिम रेल्वेवरील तीन ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात येणार असून ऑक्टोबरनंतर काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर दोन स्थानकांदरम्यान १५ ठिकाणी १७ पादचारी पुलांसाठीही निविदा काढण्यात आल्या होत्या. २३ ऑगस्टला निविदा उघडण्यात आल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. साधारणपणे दोन महिन्यांनंतर कामाला सुरुवात होईल. त्याबरोबरच स्थानकांवर सरकते जिने, लिफ्ट, पादचारी मार्गिका, भुयारी मार्गाचेही काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दोन स्थानकांदरम्यानही रूळ ओलांडताना प्रवाशांना अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्याने एमयूटीपी-३ अंतर्गत एमआरव्हीसीने २६ पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हार्बरवर नऊ पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. त्याचे कंत्राटही देण्यात आले आहे. हार्बरवरील पुलांचे काम सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

पूल, सरकते जिने, भुयारी मार्ग

पश्चिम, मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवर एकूण ३६ ठिकाणी प्रवासी रूळ ओलांडत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण २६ पादचारी पूल (हार्बरवर ९ आणि मध्य, पश्चिम रेल्वेवर १७), ३९ सरकते जिने, २८ लिफ्ट, पादचारी मार्गिका, भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये मध्य व पश्चिम रेल्वेवरील सुविधांसाठी १६० कोटी रुपये आणि हार्बरवरील पादचारी पुलांसह अन्य सुविधांसाठी ४० कोटी रुपये खर्च येणार आहे.