पादचारी, वाहतूक यांचा आढावा घेऊन अनेक रस्त्यांवरील वेगमर्यादेत बदल

मुंबई : पादचाऱ्यांचे प्रमाण, वाहतूक कोंडी, वाहनांची गर्दी यांचा आढावा घेऊन वाहतूक पोलिसांनी मुंबईतील महत्त्वाचे मार्ग, जोडरस्ते, उड्डाणपूल यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठीच्या वेगमर्यादेत बदल केले आहेत. त्यानुसार पूर्व मुक्त मार्गावरील वेगमर्यादा काही वळणांचा अपवाद वगळता ‘ताशी ८० किमी’ इतकी करण्यात आली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग वगळता शहर-उपनगरे, पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील वेगमर्यादा वाढवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने देशातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जलदगती मार्ग (एक्स्प्रेस वे), शहरी मार्ग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील मार्गावर वाहनांची वेगमर्यादा निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील मार्गावरील वेगमर्यादा निश्चित करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अभियंत्यांसोबत वाढती वाहन संख्या, पादचारी, वाहतूक कोंडी, अद्ययावत वाहने आदी सर्व बाबींवर चर्चा करून हा निर्णय घेतला.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघात टाळण्यासाठी वेगाला वेसण घालण्यात आली होती. मात्र शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. वेगमर्यादेमुळे घाईच्या वेळेत वाहतूक कोंडी होते, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. जे. जे. उड्डाणपूल बांधण्यात आला तेव्हाची आणि आताची वाहनांची संख्या आणि वाहनांमधील सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये बरीच तफावत आढळते. आताची वाहने ठरावीक वेगात वळण घेण्यास सक्षम आहेत. या सर्व बाबींचा विचार करून वेगमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मध्यंतरी जेजे उड्डाणपुलावर सर्वत्र ३० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा होती. ती वाढवून ५० पर्यंत करण्यत आली. शुक्रवारी नव्या आदेशानुसार ती ६० किलोमीटर प्रतितास अशी करण्यात आली. उड्डाणपुलावरील मांडवी टपाल कार्यालयाजवळील वळणावर मात्र ही मर्यादा ३५ किलोमीटर प्रतितास असेल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे पूर्व मुक्त मार्गावरील कमाल ८० तर किमान ३० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा होती. नव्या निर्णयानुसार शिवडी रेल्वे स्थानक आणि वडाळा रॅम्प वगळता उर्वरित पूर्व मुक्तमार्गावरून वाहने सरसकट ८०च्या वेगाने धावू शकतील.

अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि पूर्व मुक्त मार्ग पादचारी वापरत नाहीत. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील वेगमर्यादेचे टप्पे कमी केले. फक्त एखाद दुसरे वळण सोडल्यास उर्वरित मार्गावरील वेगमर्यादा ८० करण्यात आली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील पादचाऱ्यांची संख्या, जोडरस्ते आदींचा विचार करून येथील वेगमर्यादा कमी करून ७० किलोमीटर प्रतितास करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

मार्ग आणि त्यावरील वेगमर्यादा

  • ८० –  किमी प्रतितास ’ पूर्व मुक्त मार्ग (शिवडी रेल्वे स्थानक आणि वडाळा रॅम्पजवळील वळणांवर वेगमर्यादा ३५)
  •  सागरी सेतू (स्ट्रीट लाईट पोल क्रमांक १८ ते ३४ दरम्यान ४० तर काही ठिकाणी वेगमर्यादा ३५)
  •  ७०किमी प्रतितास-’ पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग  ’ शीव-पनवेल द्रुतगती मार्ग  ’ लालबाग उड्डाणपूल ’ जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल ’ नानालाल मेहता उड्डाणपूल
  • सांताक्रूज-चेंबूर जोडरस्ता
  • ६०किमी प्रतितास- ’ जे. जे. पूल (मांडवी टपाल कार्यालयाजवळील वळणावर ३५) ’ नेताजी सुभाषचंद्र मार्ग (मरिन ड्राइव्ह) – ६५ किलोमीटर प्रतितास