आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून इव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

ही पत्रकार परिषद केवळ निवडणूकीच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी असून यामध्ये निवडणूक तारखा जाहीर होणार नाहीत असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच सांगितले. त्यानुसार, सिंह यांनी मतदार यादी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, ३१ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे. असे असले तरी नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापूर्वी १० दिवस आधीपर्यंत मतदारनोंदणी करता येत असल्याने यापूर्वी नोंदणी करु न शकलेल्या मतदारांना अजूनही मतदार नोंदणीची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार असून त्यामध्ये ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला आणि २ हजार ५९३ तृतीयपंथी मतदार आहेत. १५ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार ४ कोटी ६३ लाख २७ हजार २४१ पुरुष, ४ कोटी २२ लाख ५७ हजार १९३ महिला आणि २ हजार ५२७ तृतीयपंथी असे एकूण ८ कोटी ८५ लाख ८६ हजार ९६१ मतदार होते. १५ जुलैनंतर नंतर मतदार यादीमध्ये सुमारे १० लाख ७५ हजार ५२८ इतके नवीन मतदार समाविष्ट झाले आहेत; तर २ लाख १६ हजार २७८ इतके मतदार वगळण्यात आले आहेत.

दरम्यान, मयत, अन्यत्र स्थलांतरीत किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादीतील तसेच वगळण्यात आलेल्या नावांची यादी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदारांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. तेव्हा मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी आणि वगळण्यात आलेल्या नावांबाबत समस्या असल्यास पुन्हा योग्य पुराव्यांच्या आधारे मतदार नोंदणी करुन घ्यावी. ऑनलाईन मतदार नोंदणी तसेच यादीतील तपशिलात बदल करण्यासाठी ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध असून http://www.nvsp.in या संकेतस्थळाचा त्यासाठी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी यंत्रणेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच पुरेशा संख्येने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे मतदान केंद्रांच्या तुलनेत बॅलट युनिट १७५ टक्के, कंट्रोल युनिट १२५ टक्के आणि व्हीव्हीपॅट १३५ टक्के इतकी उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत. सर्व इव्हीएमच्या प्रथम स्तरीय चाचणीची (फर्स्ट लेव्हल चेक) कार्यवाही पूर्ण झाली असून याप्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते, असेही यावेळी सिंह यांनी सांगितले.

पूरग्रस्तांची मतदार ओळखपत्रे मोफत उपलब्ध करुन देणार

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे कागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्रे देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.