कल्याण-डोंबिवलीच्या जनतेने शिवसेनेला सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून दिले असले, तरी सत्तेच्या चाव्या एकहाती शिवसेनेकडे सोपविलेल्या नाहीत. महापौर पद मिळवण्यासाठी शिवसेनेला अन्य पक्षांची किंवा अपक्षांची मदत घ्यावीच लागेल. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही प्रचारावेळी घेतलेले आक्रमक रूप काहीसे मागे ठेवत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सामंजस्याची भूमिका स्वीकारली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखामधून विकासासाठी सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागेल, असे लिहिण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक गाजली ती मुळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाकयुद्धामुळे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीमध्ये ५२ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, महापौर पद मिळवण्यासाठी ६१ जागांची गरज आहे. त्याचवेळी ४२ जागा जिंकत भाजप दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष ठरला आहे. आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार की दुसऱ्या पर्यायांची चाचपणी शिवसेना करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने म्हटले आहे की, ‘कल्याण-डोंबिवलीतील विधानसभा भाजपाने जिंकल्या, पण हा परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला. हा बालेकिल्ला मजबुतीने शिवसेनेच्याच मागे उभा आहे हे कालच्या निकालाने दिसले. कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात जोरदार तोफा धडाडल्या. एकमेकांच्या कासोट्यास हात घालण्याचा प्रयत्न झाला, पण शिवसेनेचा कासोटा घट्ट आहे व तो तसाच राहील. जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. निवडणुकीच्या राजकारणात जे घडते ते शेवटी प्रवाही असते. झाले ते झाले. आम्हाला कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचा ध्यास आहे. त्यासाठीच तेथील जनतेने शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. विकासासाठी सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागेल.’