ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या स्थलांतराच्या प्रश्नाला आता जातीय राजकारणाचे धुमारे फुटू लागले असून मुंब्रा परिसरातील सुमारे एक हजार कुटुंबांचे स्थलांतर वर्तकनगर येथे करण्याऐवजी कौसातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घरांमध्ये करावे, अशी जाहीर भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे ठाण्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यावरून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वर्तकनगर भागातील ‘दोस्ती विहार’ प्रकल्पातील सुमारे १४०० घरांचे हस्तांतरण महापालिकेकडे केले आहे. या घरांमध्ये ठाण्यासह मुंब्रा, कौसा परिसरातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, असे मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे. मात्र, आपल्या पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या वर्तकनगर परिसरात ‘मुंब्रा’ वसविण्यास शिवसेनेने विरोध सुरू केला असून वागळे, नौपाडय़ातील रहिवाशांचे येथे स्थलांतर करा, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे.
मुंब्रा शीळ येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानंतर ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरात सुमारे ११०० इमारती धोकादायक असून त्यापैकी ५७ इमारती अतिधोकादायक आहेत. या अतिधोकादायक इमारती तात्काळ पाडल्या जाव्यात, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू करताच राजकीय नेत्यांनी त्यास विरोध
केला.
या इमारतींमधील रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, मगच त्या पाडा, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी मांडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या बाजूने कळवळा व्यक्त केला. या मुद्दय़ावरून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी अभद्र युती करत ठाणे बंद पाडले.
राजकीय दबाव वाढतो आहे हे पाहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या रेन्टल हाऊसिंगच्या घरांमध्ये अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल, अशी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर तब्बल महिनाभरानंतर एमएमआरडीएने वर्तकनगर भागातील दोस्ती विहार संकुलातील सुमारे १४०० घरांचे महापालिकेकडे हस्तांतरणही केले. या घरांमध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, कौसा भागातील ५७ अतिधोकादायक इमारतींमधील  सुमारे २००० कुटुंबांचे पुनर्वसन करावे, असे ठरले. तरीही पायाभूत सुविधांच्या प्रश्नामुळे हे पुनर्वसन चर्चेपुरतेच मर्यादित
राहिले.
दरम्यान, शुक्रवारी पहाटे मुंब्रा रेल्वे स्थानकालगत असलेली स्मृती नावाची इमारत कोसळताच रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून मुंब्रा भागातील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे वर्तकनगरमधील दोस्तीमध्ये पुनर्वसन केले जावे, असा मुद्दा महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मांडला गेला. मात्र, मुंब््रयातील रहिवाशांचे कौसातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (बीएसयूपी) घरांमध्ये स्थलांतर करा, वर्तकनगरमध्ये नौपाडा, वागळे भागातील रहिवाशांना आणा, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे स्थलांतराच्या मुद्दय़ाला जातीय रंग चढण्याची शक्यता आहे. वर्तकनगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा भरणा असून मुंब्रा, कौसातील रहिवासी येथे नकोत, अशी भूमिका त्यांनी दबक्या आवाजात मांडल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुंब््रयातील रहिवाशांचे त्याच भागात स्थलांतर व्हावे. जेणेकरून त्यांना आपल्याच परिसरात राहत असल्यासारखे वाटावे. म्हणून शिवसेनेने ही भूमिका घेतली असून त्यास जातीय रंग देण्याचा प्रयत्न  करू नये, असे मत शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.