मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये प्रामुख्याने चालकांचीच चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. एका चालकाच्या चुकीमुळे ज्याची काहीही चूक नाही अशांनाही विनाकारण फटका सहन करावा लागला आहे. वेगात गाडी चालविणे वा मद्यपान करून गाडी चालविणाऱ्यांनी किमान दुसऱ्यांचा विचार करावा, अशी अपेक्षा राज्याच्या महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विजय कांबळे यांनी स्पष्ट केले. अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी आम्ही घेतली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आल्याचेही कांबळे यांनी स्पष्ट केले.
आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघाती मृत्यूमुळे पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेवरील अपघातांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामार्ग पोलिसांनी आतापर्यंत जितकी काळजी घ्यायला हवी होती तेव्हढी घेण्यात आली आहेत. अपघातांचे स्वरुप पाहता पोलिसांच्या ढिलाईमुळे काहीही झालेले नाही. एका चालकाच्या चुकीचा फटका दुसऱ्याला बसत आहे. तरीही वेगाची नशा कमी करण्याची कोणाचीही इच्छा नाही. एक्स्प्रेसवेवर रात्रीच्या वेळी वाहन चालविणे सोयीचे व्हावे या दिशेने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एक्स्प्रेसवेवर कुणीही थांबू नये, असे वारंवार सांगूनही लोक थांबतात, याकडेही कांबळे यांनी लक्ष वेधले. रात्रीच्या वेळी महामार्ग पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. कोणालाही एक्स्प्रेस-वेवर थांबू दिले जात नाही. परंतु आता दुभाजक तोडूनच थेट गाडीच अंगावर येणार असल्यास पोलीस तरी काय करणार, असा सवालही त्यांनी केला. गाडी चालकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा चालकांविरुद्ध आम्ही कारवाईही करतो. किंबहुना अशा कारवाईमुळे एक्स्प्रेस-वेवरील अपघातांमध्ये काही प्रमाणात तरी घट झाल्याचेही कांबळे यांनी स्पष्ट केले.