‘लोकसत्ता संपादक शिफारस’: वाचनभान वाढविण्याकरीता विशेष योजना
ग्रंथ आणि वर्तमानपत्रे यांच्यात एक आंतरिक नाते असते. असायला हवे. हे नाते परिपूर्ण होते त्यांचा वाचकांशी संयोग झाल्यावर. या संयोगातून जन्माला येते वाचनसंस्कृती. परंतु अलीकडच्या काळात वर्तमानपत्रांचे वर्तन आमचा वाचनसंस्कृतीशी संबंधच काय, अशा प्रकारचे असून ते सुसंस्कृत समाजनिमिर्तीसाठी घातक आहे. यात सकारात्मक बदल व्हावा याच उद्देशाने दै. ‘लोकसत्ता’ प्रकाशकांच्या सहकार्याने घेऊन येत आहे विशेष ग्रंथ योजना : ‘लोकसत्ता संपादक शिफारस’. विख्यात संगीतशास्त्री कै. अशोक दा. रानडे यांचा ‘पाश्चात्य संगीत संज्ञा कोश’ आणि डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘उत्क्रांतियात्रा’ हे या योजनेतील पहिले मानकरी असतील. ही पुस्तके अनुक्रमे पॉप्युलर आणि राजहंस यांची प्रकाशने आहेत.
आज जागतिक ग्रंथ दिन. योगायोग असा की, विल्यम शेक्सपिअर ते स्पॅनिश लेखक मिगेल दि सव्‍‌र्हातेस अशा अनेक लेखकांचा २३ एप्रिल या दिवसाशी काही ना काही कारणाने संबंध आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांतर्फे आजचा दिवस जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा होतो. या ग्रंथसंस्कृतीस आदरांजली म्हणून आजच्या मुहूर्तावर या योजनेची घोषणा आम्ही करीत आहोत.
वाढता खर्च, बाजारपेठेच्या मर्यादा आणि जोडीला वर्तमानपत्रांची वाढती उदासीनता यामुळे मराठी ग्रंथव्यवहार दिवसेंदिवस खडतर होत असून, ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या योजनेमुळे पुस्तक प्रसारास नक्कीच मदत होईल, असा विश्वास मराठीतील नामवंत प्रकाशकांनी या योजनेसंदर्भातील चच्रेत व्यक्त केला. ‘पॉप्युलर’चे रामदास भटकळ, ‘मॅजेस्टिक’चे अशोक कोठावळे, ‘राजहंस’चे संपादक डॉ. सदानंद बोरसे, ‘डायमंड’चे दत्तात्रय पाष्टे, ‘रोहन’चे प्रदीप व रोहन चंपानेरकर, ‘पद्मगंधा’चे अरुण जाखडे, ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर आदी मान्यवर प्रकाशक या संदर्भातील चच्रेत उपस्थित होते.
या योजनेनुसार ‘लोकसत्ता’ काही निवडक दर्जेदार पुस्तकांच्या प्रसाराची आणि प्रचाराची जबाबदारी घेणार असून, त्यात ‘लेखक-वाचक संवाद’, आगामी पुस्तकातील निवडक भागाचे लेखकाकडून वाचन अशा कार्यक्रमांचाही समावेश असेल.
 ही पुस्तके महाजालात ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावरूनदेखील विक्रीस उपलब्ध करून दिली जातील आणि ‘लोकसत्ता’च्या वाचकांना या योजनेतील पुस्तकांवर विशेष सवलत दिली जाईल. या योजनेचे अन्य तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.   

शुभारंभ..
‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेचा प्रारंभ होत आहे विख्यात संगीतशास्त्री कै. अशोक दा. रानडे आणि संवेदनशील पर्यावरणशास्त्री लेखक डॉ. माधव गाडगीळ यांच्या पुस्तकांनी. कै. रानडे यांचा ‘पाश्चात्त्य संगीत संज्ञा कोश’ हा संगीताचे वैश्विकीकरण होत असताना संगीत साधक, अभ्यासक आणि डोळस रसिक यांच्यासाठी निश्चितच महत्त्वाचा दस्तावेज ठरेल. तर जीवशास्त्रातील नवनवीन संकल्पना, नवी निरीक्षणे, दैनंदिन पर्यावरणाशी संबंधित अनेक बाबी आदींवरील महत्त्वपूर्ण भाष्य यामुळे डॉ. गाडगीळ यांचे ‘उत्क्रांतियात्रा’ वैशिष्टय़पूर्ण ठरेल.