हवाला व्यवहार असल्याचा संशय

लाखो रुपयांचे परदेशी चलन अवैधपणे शारजा येथे नेणाऱ्या तरुणाला रविवारी केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) विमानतळावर अटक केली. या तरुणाकडून तब्बल ४४ लाख रुपयांचे (भारतीय चलन किंमत) परदेशी चलन हस्तगत करण्यात आले. त्यात डॉलर आणि पाऊंडचा समावेश आहे. हा हवाल्याचा व्यवहार असावा, असा संशय एआययूला आहे.

सय्यद रेहमान अली (वय ३५) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. सय्यद गेल्या तिनेक वर्षांपासून पोटापाण्यासाठी शारजा येथे वास्तव्यास आहे. तेथील एका प्रकाशनगृहात तो काम करतो. रविवारी सकाळी मुंबईत आल्यानंतर सय्यद डोंगरीतील एका ‘गेस्ट हाऊस’मध्ये उतरला. आधीच ठरल्यानुसार तेथे आलेल्या सलाम नावाच्या तरुणाने सय्यदची बॅग स्वत:सोबत नेली. सायंकाळी बॅग पुन्हा सय्यदला आणून दिली. रविवारी रात्रीच सय्यद पुन्हा शारजाला जाण्यासाठी विमानतळावर आला. अवघ्या काही तासात परत निघाल्याने एआययू अधिकाऱ्यांना त्याचा संशय झाला. सय्यदची झडती घेतली असता पायमोज्यांमध्ये १० हजार डॉलर्स आढळून आले. तर त्याच्या बागेमध्ये आतील बाजूच्या प्लास्टिकच्या आच्छादनात अत्यंत चपखलपणे परकीय चलन दडवलेले होते. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली.

हे चलन दुबईत व्यापारी असलेल्या सलीम नावाच्या व्यक्तीकडे पोचवण्याची जबाबदारी सय्यदवर होती. अटकेनंतर सय्यद न्यायालयीन कोठडीत असून त्याला पुढील चौकशीसाठी एआययूने बोलावले आहे. हे परकीय चलन हवाला व्यवहारातील असावे, असा संशय एआययूला आहे. त्या दृष्टिकोनातून चौकशी केली जाईल, असे एआययूतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला सांगितले. दरम्यान, हे परकीय चलन सलीमला पोच केल्यानंतर सय्यदला ‘कमिशन’ मिळणार होते.