देशातील वित्तीय संस्थांनी उत्साह न दाखविल्याने शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अपयशी ठरल्यानंतर मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पाचे काम आपल्या हाती घेतले आह़े  आता या महत्त्वाकांक्षी सागरी सेतूसाठी परदेशातून कर्ज मिळवण्याची धडपड सुरू केली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा व पुढे चिर्लेपर्यंत जाणाऱ्या २२ किलोमीटर लांबीच्या ९६३० कोटी रुपयांच्या सागरी सेतू प्रकल्पाची निविदा ऑगस्टमध्ये सलग तिसऱ्या वेळी अपयशी ठरली. त्यानंतर आपणच हा प्रकल्प राबवण्याच्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयारी सुरू केली होती.
या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी ८० टक्के रक्कम कर्ज म्हणून उभी करावी लागेल. त्यासाठी प्राधिकरणाने जागतिक बँक, ‘जायका’ ही जपानची वित्तीय संस्था आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यासारख्या परदेशी वित्तीय संस्थांशी बोलणी सुरू केली आहेत, असे ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी म्हटले आहे.
यापूर्वी प्राधिकरणाच्या प्रकल्पांना परदेशी संस्थांनी अर्थसाह्य दिले असल्याने सागरी सेतूही परदेशी गंगाजळीवर तरून जाईल, अशी ‘एमएमआरडीए’ला आशा आहे.
हा सागरी सेतू २७ मीटर रूंद असेल व सहापदरी रस्ता त्यावर असेल. जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका असतील. हा सागरी सेतू प्रकल्प २०१८ अखेपर्यंत बांधून होईल आणि २०१९ पासून तो वाहतुकीसाठी खुला होईल अशी योजना होती. रोज ६२ हजार वाहने या पुलावरून प्रवास करतील, असा अंदाज आहे.