आंतरराष्ट्रीय चोरटय़ांकडून ‘स्कीमर’ लावून माहितीची चोरी; वांद्रे परिसरातून २१ जणांच्या तक्रारी

एटीएम यंत्रात स्कीमर उपकरण लावून त्याद्वारे ग्राहकांचे पैसे काढणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश विनोबा भावेनगर पोलिसांनी केला आहे. या टोळीने केवळ भारतासह अनेकदेशांत अशा पद्धतीने पैशांचा अपहार केला आहे.

वांद्रे येथील कॅण्डीस फर्नाडिस या महिलेच्या बँकेतून १५ सप्टेंबर रोजी ३६ हजार रुपये काढल्याचा एसएमएस आला. कुर्ला येथील एटीएम केंद्रातून हे पैसे काढण्यात आले होते. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशा पद्धतीने वांद्रे परिसरातील २१ ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढले गेल्याच्या तक्रारी केल्या होत्या. विनोबा भावेनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या एटीएममधून पैसे काढले होते त्या एटीएमचे सीसीटीव्ही चित्रण मिळवले असता टोपी घातलेली व्यक्ती एटीएम केंद्रात शिरून स्कीमर उपकरण लावत असल्याचे दिसून आले.

टोपी घातल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश मोहिते यांनी त्या इसमाच्या हातातील प्लॅस्टिकच्या पिशवीचे निरीक्षण केले. त्यावर वांद्रे येथील एका दुकानाचा पत्ता होता. पोलिसांनी ते दुकान शोधले आणि त्या दुकानातीलही सीसीटीव्ही तपासले असता तो इसम आढळून आला. तो परदेशी नागरिक होता आणि त्याला दुकानदाराने ‘लॉयल्टी कार्ड’ बनवून दिले होते. त्या लॉयल्टी कार्डच्या आधारे तो खरेदी करीत होता. त्या दुकानातही त्याने खोटा पत्ता दिला होता. अखेर पोलिसांनी पाळत ठेवून त्याचा पत्ता शोधला आणि पाली हिल येथील फातिमिम निवास या त्याच्या घरावर छापा घातला. तेथून त्या इसमासह त्याच्या अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४९७ बनावट एटीएम कार्डे, २८ लाख रुपये, स्कीमर यंत्र आणि स्पाय कॅमेरे जप्त केले. पर्यटक व्हिसा घेऊन भारतात यायचे आणि स्कीमर यंत्र लावून एटीएम कार्ड क्लोन करून पैसे हडप करायचे अशी त्यांची पद्धत होती.

 

काय आहे स्कीमर?

स्कीमर नावाचे एक चीपसारखे उपकरण असते. ते एटीएम केंद्रात गुपचूप लावले जाते. त्यानंतर जो ग्राहक आपले एटीएम कार्ड यंत्रात टाकतो त्या कार्डाचा डेटा या स्कीमर यंत्रात उमटतो. त्या डेटाच्या आधारे मग हे चोरटे बनावट एटीएम कार्ड (एटीएम कार्डचे क्लोन) बनवतात आणि मग एटीएममधून पैसे काढतात.