08 July 2020

News Flash

तपासचक्र : तिची काय चूक होती?

घोडपदेव, म्हाडा संकुलातल्या विघ्नहर्ता सोसायटीत १५व्या माळ्यावर इंगळेंच्या घरात लगबग सुरू होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

मानवीच्या मृत्यूला खरंच काही कारण होतं का? संपूर्ण घटनेत तिची वा तिच्या कुटुंबीयांची काही चूक होती का? .. इंगळे दाम्पत्याच्या त्रिकोणी कुटुंबातली ती नाजूक रेषा क्षणार्धात मिटून गेली. ‘का?’ असे विचारतच..!

घोडपदेव, म्हाडा संकुलातल्या विघ्नहर्ता सोसायटीत १५व्या माळ्यावर इंगळेंच्या घरात लगबग सुरू होती. वडील अशोक आपल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला, मानवीला तयार करत होते. तयारी करून तिला काळाचौकीत आजोळी सोडायचं होतं. तिथूनच ती शाळेत जाणार होती. इंगळे दाम्पत्याचा हा नित्याचा कार्यक्रम. मानवीला दुपारी आजोळी सोडायचं आणि रात्री कामावरून परतताना घरी आणायचं. १९ डिसेंबर २०१६.  दुपारी बाराच्या सुमाराला अशोक यांनी मानवीची तयारी पूर्ण केली. आवराआवर करून ते दोघे निघणार होते. तेवढय़ात मानवी घराबाहेर पळाली. शेजाऱ्यांच्या घरात तिचा राबता असायचा. खालच्या मजल्यावर मित्रमंडळींकडेही ती जात असे. त्यामुळे मानवी तिकडेच गेली असावी, असे समजून अशोक इंगळे निश्चिंत होऊन स्वत:च्या तयारीला लागले. त्यांची तयारी आटोपताच त्यांनी मानवीला हाक मारली. परंतु, ती आली नाही. शेजाऱ्यांकडे, खालच्या मजल्यावरही अशोक यांनी शोध घेतला. मात्र मानवी कुठेच नव्हती. तिला शोधण्यासाठी अशोक यांनी आणखी दोनेक माळे खाली उतरून तिला हाका मारल्या. पण मानवीचा आवाज येत नव्हता. ते परत आपल्या माळय़ावर आले असता, माळय़ावरच्या खिडकीतून त्यांना खाली रस्त्य़ावर रक्ताच्या थारोळय़ात पडलेली मानवी दिसली. अशोक यांच्या भोवतीचं अवघ जग फिरलं. तशाच अवस्थेत हेलकांडत, धावत ते खाली उतरले. तेवढय़ात इमारतीतील अन्य रहिवाशांनाही या दुर्घटनेची माहिती मिळाली.

या घटनेचे वृत्त समजताच भायखळा पोलीस इमारतीत दाखल झाले. मानवी अपघाताने खाली पडली असावी, असा पोलिसांचा अंदाज होता. पण काही गोष्टी हा अंदाज खोटा ठरवू पाहात होत्या. पोलिसांनी तातडीने इमारतीतील सर्व सीसीटीव्हींचे चित्रण ताब्यात घेतले. त्यापैकी एका चित्रणात दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी मानवी खाली पडल्याचे दिसत होते. पण ती स्वत: पडली की कोणी ढकलले, हे स्पष्ट होत नव्हते.

एकुलती एक मुलगी क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने इंगळे दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आपली मुलगी अपघाताने खाली पडू शकत नाही, असे ते वारंवार पोलिसांना सांगत होते. ते राहात असलेल्या मजल्यावरील रेखा सुतार, सिंधू राऊत यांच्यासह घरी सुतारकाम करणारे दोन सुतार, मानवी पडल्याची माहिती सांगत वर येत असलेला सफाई कामगार या साऱ्यांवरच त्यांनी संशय व्यक्त केला. कौटुंबिक कलहामुळे रेखा काही महिन्यांपासून आपल्या भावाकडे राहायला आल्या होत्या. त्यातच आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या अकरा वर्षांच्या मुलाचं अपघाती निधन झालं होतं. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं होतं. सतत चिडचिड, शीघ्रकोपी स्वभावामुळे इंगळे आणि अन्य शेजाऱ्यांसोबत त्यांचे सतत खटके उडत. शिवाय घटनेच्या आधी अशोक जेव्हा मानवीला शोधण्यासाठी घराबाहेर पडले तेव्हा रेखा त्यांना भेटल्या होत्या. मानवी जिथून खाली पडली तिथूनच त्या येत होत्या. अशोक यांनी मानवीला पाहिलंत का, असं त्यांना विचारलं होतं. त्यांनी नकारार्थी मान डोलावली होती. मी गच्चीत कपडे वाळत घालायला गेले होते, असं त्यांनी सांगितलं. पण त्यानंतर अशोक जेव्हा गच्चीत गेले तेव्हा तिथे एकही कपडा त्यांना आढळला नव्हता.

सिंधू राऊत यांच्यासोबतही इंगळे यांचे किरकोळ कारणावरून खटके उडाले होते. एकदा रागाच्या भरात सिंधू यांनी इंगळेंचे वाळत घातलेले कपडे जाळले. त्यात मानवीचा शाळेचा गणवेषही होता. त्यामुळे इंगळे दाम्पत्याचा सिंधूंवरही संशय होता. घरात सुतारकाम करणारे सद्दाम व विनोद या सुतारांशी इंगळेंचा वाद घडला होता. घटना घडली तेव्हा ते खालच्या मजल्यावर काम करत होते. रागाच्या भरात त्यांनीही हा गुन्हा केला असावा, असे इंगळेंना वाटत होते. पोलिसांनीही अपघात की हत्या हे जाणून घेण्यासाठी न्यायवैद्यक तज्ञांची मदत घेतली. केईएम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. राजेश डेरे यांची तपासात पोलिसांना मोलाची मदत झाली. डेरे यांनी मानवीच्या उंची, वजनाच्या बाहुल्या तयार करून घेतल्या. मानवी १५व्या माळ्यावरून पडली त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यात एक बाहुली स्वत:हून खाली पडली आणि दुसरी फेकण्यात आली. फेकण्यात आलेल्या बाहुलीची अवस्था आणि मानवीच्या मृतदेहाची अवस्था, जखमा मिळत्याजुळत्या होत्या. त्यावरून मानवीला कोणीतरी खाली फेकलं या इंगळे दाम्पत्याच्या संशयात पोलिसांना तथ्य आढळलं. पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. त्यांनी इंगळे दाम्पत्याने संशय व्यक्त केलेल्यांसोबत मानवीचे वडील, अशोक यांचीही चौकशी सुरू केली. परंतु, सखोल चौकशीअंती अशोक, दोन्ही सुतार कामगार आणि सफाई कामगार हे निदरेष असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी रेखा आणि सिंधू यांच्याकडे आपला मोर्चा वळवला.

मानसोपचारतज्ज्ञांकडून दोघींचं समुपदेशन करण्यात आलं. त्यात रेखा यांच्या मनात इंगळे कुटुंबाबद्दल प्रचंड राग, मत्सर जाणवला. मुलाच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यातून त्या सावरल्या नव्हत्याच. पण मानवीचं नाव आलं की त्या कासावीस होत होत्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. तसेच आतापर्यंतच्या तपासातून ठोस, परिस्थितीजन्य पुरावेही हाती लागत नव्हते. नुसत्या संशयाच्या जोरावर कारवाई करणं भायखळा पोलिसांनी टाळलं. या दोघींच्या नखांचे नमुने वैद्यकीय तपासणी, डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातल्या रेखा यांच्या नखात चामडीचा अत्यंत पातळ पापुद्रा तपासणीत आढळला. परंतु, डीएनए तपासणीसाठी तेवढा पापुद्राही पुरेसा होता. त्यातून तो मानवीच्याच त्वचेचा भाग असल्याचे सिद्ध झाले. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात न्यायवैद्यकतज्ज्ञांनी हा अहवाल भायखळा पोलिसांना पाठवला. तो हाती पडताच क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी रेखा यांना बेडय़ा ठोकल्या.

रेखा यांनी मानवीची हत्या का केली, याचं कारण ऐकून पोलीसही चकित झाले. या घटनेच्या काही वेळ आधी कोर्टाचा बेलिफ नोटीस घेऊन रेखा यांच्या घरी आला होता. काडीमोड घेण्यासाठी त्यांच्या पतीने पाठवलेली ती नोटीस होती. परंतु, रेखा यांनी ती नोटीस स्वीकारण्यास नकार दिला; तेव्हा बेलिफने इंगळे यांचे दार ठोठावले. अशोक यांनी रेखा यांची समजूत काढून नोटीस स्वीकारण्याविषयी सांगितले. परंतु, त्यांचेही न ऐकता रेखा संतापाच्या भरात बाहेर पडल्या. तेथे बाहेर त्यांना मानवी दिसली. रागाच्या भरात त्यांनी मानवीला उचलले आणि १५व्या मजल्यावरून फेकून दिले.  मानवीच्या मृत्यूला खरंच काही कारण होतं का? संपूर्ण घटनेत तिची वा तिच्या कुटुंबीयांची काही चूक होती का? पण मानसिक अवस्था बिघडलेल्या रेखा यांनी कसलाही विचार न करता, त्या चिमुरडीला खाली भिरकावले. इंगळे दाम्पत्याच्या त्रिकोणी कुटुंबातली नाजूक रेषा क्षणार्धात मिटून गेली. ‘का?’ असे विचारतच..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2017 1:49 am

Web Title: forensic evidence help to cracked manvi ingle murder case
Next Stories
1 मुंबई महापालिकेची यंदा ‘वास्तववादी’ कपात!
2 पोटच्या गोळ्यासाठी मातेची बिबटय़ावर झडप!
3 परळीच्या पराभवाची परतफेड!
Just Now!
X