बिबटय़ाच्या हल्ल्यातील जखमी महिलेनेच भरला दंड
बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला वन विभागाने मदतीची बोळवण म्हणून दिलेला धनादेश वटला नसल्याने त्या महिलेलाच बॅंकेत दंड भरावा लागला आहे. सात महिने झाले तरी त्या महिलेला अजून भरपाई मिळाली नसल्याने रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.
गुहागर तालुक्यातील भातगाव येथे ११ ऑगस्ट २०१२ रोजी भारती परशुराम डिंगणकर ही महिला गुरे चारण्यासाठी गेली असता बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला. जखमी महिलेला सुरुवातीला जाकादेवी येथील आनंदी नर्सिग होममध्ये व नंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेने वन विभागाकडे भरपाईची मागणी केली. परंतु तिला कुणी दाद दिली नाही. त्यांनी मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांच्या मदतीने मंत्रालयात वन विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर वन विभागाच्या चिपळूण कार्यालयाने त्या महिलेला वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी तातडीची मदत म्हणून ३ हजार २८ रुपये देण्याचा आदेश काढला. तो धनादेश जनता सहकारी बॅंकेच्या माखजन शाखेत जमा करण्यात आला. १ मार्चला बॅंकेकडून त्या महिलेला पैेसे नेण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र, धनादेश वटला नसल्याने त्यांच्याकडून ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मदतीच्या आशेने गेलेल्या या दांपत्याला दंड भरुन रिकाम्या हाताने परतावे लागले.