मुलुंड जवळच्या योगी नगर भागात आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातंर्गत येणाऱ्या जंगलातील चार ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग वणव्यामुळे नाही तर जाणीवपूर्वक लावण्यात आली आहे अशी माहिती मिळते आहे.  डोंगरावर असलेल्या झाडांना आग लागली आहे. या आगीची छायाचित्रे लोकसत्ता ऑनलाइनच्या हाती आली आहेत.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुलुंड आणि तुळशी या ठिकाणी एकाच वेळी आग लागली. त्यानंतर दोन तासात वागळे इस्टेट आणि येऊर भागातील जंगलांमध्ये आग लागली. तर आरे भोवती असलेल्या जंगलात आगीची चौथी घटना घडली. जंगलांमध्ये वणवा पेटला असे भासवले गेले असले तरीही या चारही ठिकाणी आग लावण्यात आली आहे. वन जमिनींवरील वनस्पती आणि झाडे जळून जावीत आणि या जमिनींवर कब्जा करावा हा यामागचा उद्देश आहे अशी माहिती वन संरक्षक अन्वर अहमद यांनी दिली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

फोटो सौजन्य- जनक राठोड

आगीच्या अशा घटना नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्या कर्मचाऱ्यांना संजय गांधी नॅशनल पार्कच्या विविध भागात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे या जंगलात असलेल्या वन्य जीवांना आणि पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे असेही अन्वर यांनी म्हटले आहे. जंगलांना माणसांकडूनच आग लावण्यात येते आहे. या प्रकरणी सोमवारीच आम्ही राजेश मोकाशी या २५ वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याला ठाण्यातील मॅजिस्ट्रेट कोर्टात हजरही केले होते. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

फोटो सौजन्य- जनक राठोड

मंगळवारी चार ठिकाणी लावण्यात आलेली ही आग नेमकी कोणी लावली ते आत्ता सांगता येणे कठीण आहे. या ठिकाणी आग लावून काही लोक पळून जातात. त्यांचा सुगावा लावणे नंतर कठीण होऊन बसते मात्र आम्ही जंगल भागात गस्त वाढवणार आहोत असेही अहमद यांनी स्पष्ट केले. मुलुंडमधील जंगल भागात लागलेली आग नियंत्रणात आली आहे अशी माहिती शैलेश देवरे या रेंज फॉरेस्ट ऑफिसरनी दिली. तर इतर भागातील आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु असल्याचे आणि त्या ठिकाणी वन विभागाचे ३० ते ३५ कर्मचारी कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्यातील नागला बंदर भागातही आग

मुलुंडच्या योगी नगर भागात वणवा पेटल्याची घटना घडली आहे तर दुसरीकडे ठाण्यातील नागला बंदर परिसरातही आग लागल्याची घटना घडली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी एक फायर इंजिन आणि मदत आणि बचाव कार्यासाठी एक वाहन आले आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.