राजभवनाला सोमवारी भेट देणार
राजभवनाच्या पसिसरातील मोरांची दयनीय अवस्था पाहून खुद्द राज्यपाल विद्यासागर राव चिंतित आहेत. राजभवन मोरांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. आता कुपोषणग्रस्त मोरांना वाचविण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारही पुढे आले आहेत. सोमवारी राजभवनाला भेट देऊन ते मोरांना सामना करावा लागत असलेल्या समस्यांचा आढावा घेणार आहेत.
मलबार हिलला समुद्राला खेटून राजभवन आहे. राजभवनाचा ४७ एकराचा परिसर हिरव्यागार वृक्षवेलींनी फुललेला आहे. परंतु अशा आल्हाददायी वातावरणातही राष्ट्रीय पक्ष असलेल्या मोरांना कुपोषण, मुंगूस, भटकी कुत्रे, मांजरे, उंदीर यांच्या आक्रमणाचा सामना करावा लागत आहे.
राजभवनाच्या परिसरात फार पूर्वीपासून मोरांचा वावर आहे. परंतु त्यांना सर्वाधिक त्रास मुंगूस व भटक्या कुत्र्यांचा आहे. मुंगसांची संख्या खूपच वाढली आहे. पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. युवराज कागिनकर व त्यांच्या पथकांनी केलेल्या पाहणीत मोरांना जीवनसत्त्वयुक्त अन्नांचा अभाव असल्याने त्यांना कुपोषणाचा सामना करावा लागत असल्याचे आढळून आले. त्याला प्रमुख कारणे भटकी कुत्री, उंदीर, मांजरे आहेत. राजभवनाचे कर्मचारी मोरांना खाण्यासाठी धान्य टाकतात, परंतु कुत्री, मुंगूस, मांजराच्या भीतीने त्यांना ते नीट खाता येत नाही. मुंगूस मोरांची अंडी फोडतात, लहान पिल्लांवर हल्ले करतात. कुपोषणामुळे मोरांना उडताही येत नाही. अशा दोन दुबळ्या मोरांचा संरक्षक भिंतीवर आपटून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम म्हणजे मोरांची संख्या वाढत नसल्याचे वैद्यकीय पथकाच्या निदर्शनास आले.
राजभवनाच्या परिसरातील मोरांची दयनीय स्थिती पाहून खुद्द राज्यपाल विद्यासागर राव चिंतित झाले. मोरांना वाचविण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी मायव्हेट चॅरिटेबल ट्रस्टला सांगण्यात आले. ट्रस्टने त्यानुसार मोरांचे संरक्षण, त्यांच्यावर त्याच ठिकाणी वैद्यकीय उपचार करणे, कुपोषणमुक्त करणे, अशी सविस्तर योजना सादर केली आहे. त्यासाठी ३५ लाख रुपयांचा खर्च आहे. उद्योगांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून त्यासाठी अर्थसाहाय्य मिळविण्याचा प्रयत्न आहे.
या संदर्भात लोकसत्ताने कुपोषणग्रस्त मोरांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणारे वृत्त प्रसिद्ध केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून मोरांना वाचविण्यासाठी तेही पुढे सरसावले आहेत. सोमवारी ते राजभवनाला भेट देऊन मोरांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे व त्यातून त्यांचे संरक्षण कसे केले जाईल, याबाबतचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.