News Flash

बदलता महाराष्ट्र : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा!

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये कृषी उद्योगावरील चर्चासत्राचा समारोप बाळासाहेब थोरात यांनी केला

‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात शुक्रवारी विविध चर्चासत्रांत झालेले कृषिमंथन

‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची अपेक्षा

उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव देऊन पूरक व्यवसायांना प्रोत्साहन आणि वेगवेगळ्या मार्गानी मदत करून शेतकरी जगविला पाहिजे. ‘स्मार्टसिटी’मध्येही शेतकऱ्यांची गरज असून शेतीवरचा लोकसंख्येचा भार कमी करण्यावर सरकारचा भर हवा, असे परखड मत माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता आणि एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर’ आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या चर्चासत्रात व्यक्त केले.

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये कृषी उद्योगावरील चर्चासत्राचा समारोप बाळासाहेब थोरात यांनी केला. शेतकऱ्यांसाठी फलदायी सर्वसमावेशक शाश्वत पीक विमा योजना आणणे आर्थिकदृष्टय़ा अवघड असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषिक्षेत्र महत्त्वाचे असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तरच अर्थव्यवस्था सुरळीत राहाते. व्यापार वाढतो आणि शेअरबाजारातही चांगली परिस्थिती राहते. पण आज कृषिमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. व्यापाऱ्यांच्या साखळीमध्येही शेतकरी भरडला जातो. त्यामुळे कृषिमालाचे दर पडतात, तेव्हा सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे थोरात यांनी नमूद केले.

‘वायदे बाजार आणि बाजारपेठ’ या परिसंवादात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी, प्रशासनाच्या धोरणात्मक त्रुटींमुळे शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. केंद्रातील भाजप सरकारने धोरणातील या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळू लागला आहे, असेही ते म्हणाले. वायदे बाजाराचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी धोरणात सातत्य असायला हवे, असे मत एमसीएक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांजपे यांनी मांडले. तसेच शेती उत्पादनाला आश्वस्त करण्याची ताकद वायदे बाजारात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारने विमा योजनांमध्ये योग्य ते बदल केले तर शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांना आंदोलनाची गरज भासणार नाही, असे मत कृषितज्ज्ञ गिरधर पाटील यांनी व्यक्त केले. तर शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई ही प्रत्यक्ष हानीच्या तुलनेत कमी मिळते. नवीन विमा योजना आखून त्यात याबाबतच्या तरतुदी बदलायला हव्यात, असे मत ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग सुरू असून आधुनिक शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मितीचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन कृषी आणि जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांनी ‘प्रयोगशील शेती’ या परिसंवादात व्यक्त केले. सेंद्रिय शेतीवर खर्च कमी येतो आणि उत्पादनही चांगले येते, असे नमूद करीत सेंद्रिय शेतीमधील प्रयोगांचे अनुभवकथन व्यंकट अय्यर यांनी केले. रोजगाराच्या निमित्ताने शहरांमध्ये डेरेदाखल झालेल्या तरुणांनी महात्मा गांधीजींनी दिलेला कानमंत्र जपत पुन्हा गावची वाट धरायला हवी, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 2:10 am

Web Title: former agriculture minister balasaheb thorat on the platform of loksatta
Next Stories
1 ‘गल्ली बॉय’ना आता हिप-हॉपचे शास्त्रोक्त प्रशिक्षण
2 वैद्यकीय अभिमत विद्यापीठांच्या शुल्कावर अखेर नियंत्रण येणार
3 बदलता महाराष्ट्र : ‘धोरणातील त्रुटी दूर केल्या तरच शेतमालाला चांगला भाव’
Just Now!
X