‘रिपब्लिक’च्या वाहिन्यांना फायदा व्हावा या उद्देशाने टीआरपी मोजताना अन्य वाहिन्यांचे गुण गाळणे तसेच स्पर्धक वाहिन्यांची व्यावसायिक गुपिते ‘रिपब्लिक’कडे उघड करणे आदी प्रकार ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी मुख्य परिचलन अधिकारी (सीओओ) रोमील रामगडिया (४०) करत होते. ‘रिपब्लिक’तर्फे त्याबद्दल त्यांना चार वर्षांपासून आर्थिक मोबदला दिला जात होता, असा दावा गुन्हे शाखेने केला.

रोमील १९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत असून त्यांच्या लॅपटॉपमधून हस्तगत कागदपत्रे, नोंदींचे ऑडिट सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २०१४ ते २०१९ या कालावधीत बार्कचे सीओओ असताना रोमील रिपब्लिक वगळता अन्य कोणत्याही वाहिनीचे संचलन करणाऱ्या कं पनी पदाधिकाऱ्यांच्या फारसे संपर्कात नव्हते. मात्र रिपब्लिक वाहिनी हाताळणाऱ्या एआरजी आऊटलायर कं पनीचे सीईओ खानचंदानी आणि एका संचालकासोबत रोमील सतत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्कात होते. रोमीलसह तिन्ही व्यक्तींनी मोबाइलमधील संभाषण डिलीट करण्याचा प्रयत्न केला. त्यातील बराचसे संभाषण मिळवण्यात गुन्हे शाखेला यश आले. या संभाषणाचे अवलोकन करता रोमील बार्कने टीआरपी मोजमापातील गैरव्यवहार शोधण्यासाठी उभारलेल्या प्रत्येक अद्ययावत यंत्रणेबाबत रिपब्लिकला आगाऊ सूचना देत.

रोमील यांनी जुलै २०२० मध्ये बार्कचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर रोमील टीआरपी घोटाळ्यात सहभागी एका वाहिनीत मोठय़ा पदावर आणि गलेलठ्ठ पगारावर नियुक्त होणार होते, अशी माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळाली असून त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

परदेशवाऱ्यांचे प्रायोजक

सचिन वाझे यांनी दिलेल्या माहितीनुसार रोमील यांना त्यांच्या सहकार्याबद्दल रिपब्लिक वाहिनीकडून खरेदीसाठीची गिफ्ट व्हाऊचर्स दिली. परदेशवाऱ्यांचे प्रायोजकत्व स्वीकारले, अशी माहिती प्राथमिक चौकशी, तपासातून पुढे आली.

अन्य वाहिन्यांच्या व्यूहरचना उघड

वाहिन्यांनी सुरू के लेल्या किंवा भविष्यात सुरू होणाऱ्या विविधांगी कार्यक्र मांबाबत बार्ककडे आगाऊ नोंद होते. सीओओ असल्याने या नोंदींबाबत रोमील यांना माहिती मिळत असे. नव्या कार्यक्रमांविषयी तसेच व्यूहरचनांविषयी ते रिपब्लिकचे सीईओ, संचालकांना माहिती देत. हे प्रकार रिपब्लिकची हिंदी वृत्त वाहिनी सुरू होत असताना रोमील यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात घडले, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाचे प्रमुख सचिन वाझे यांनी दिली.