News Flash

नगरमधील पराभवाचे विखे-पाटलांवर खापर

राम शिंदेंसह अन्य नेत्यांचा तक्रारींचा पाढा

राम शिंदेंसह अन्य नेत्यांचा तक्रारींचा पाढा

मुंबई : माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह नगर जिल्हय़ातील काही भाजप नेत्यांनी पराभवाचे खापर माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व त्यांचे पुत्र खासदार सुजय पाटील यांच्यावर फोडले. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांमुळे फायदा न होता विधानसभा निवडणुकीत फटकाच बसल्याचे गाऱ्हाणे भाजप नेत्यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत मांडले. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी विखेंविरोधात तक्रारीचा सूर लावला असला, तरी त्यांच्यावर काय कारवाई करायची, हा प्रश्नच असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

विखे पाटील व अन्य नेते भाजपमध्ये दाखल झाल्याने नगर जिल्ह्य़ात भाजपची ताकद वाढून विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याउलट जोरदार फटका बसल्याने विखे-पाटील पिता-पुत्राविरोधात भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अन्य पक्षांमधून आणलेल्या या नेत्यांचा काय उपयोग झाला, असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला होता. भाजप नेते आमदार आशीष शेलार व अन्य नेत्यांनी नगरला जाऊन या नेत्यांशी चर्चा केली होती.

त्यानंतर प्रदेश सुकाणू समितीला अहवाल सादर केल्यावर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संघटनमंत्री विजय पुराणिक व इतरांची शुक्रवारी बैठक झाली. मात्र त्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच उपस्थित नव्हते. माजी मंत्री शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले आदी नेत्यांनी विखे-पाटील यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींबाबत सविस्तर चर्चा झाली.

कारवाईबाबत प्रश्नचिन्ह..

विखे-पाटील यांनी भाजप उमेदवारांच्या विजयासाठी काम न करता अन्य उमेदवारांनाच मदत केल्याने पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला. विखे-पाटील यांनीही आपली बाजू मांडून या आरोपांचे खंडन केले. यासंदर्भात सुकाणू समितीमध्ये पुढील चर्चा होईल आणि विखे-पाटील यांच्याविरुद्धच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास त्यांना फार तर समज दिली जाईल. मात्र त्यापेक्षा अधिक काही कारवाई होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे पराभवाचा फटका बसलेल्या भाजप नेत्यांना केवळ वरिष्ठांपुढे गाऱ्हाणे मांडल्याचेच समाधान मिळणार आहे. यासंदर्भात विखे-पाटील व राम शिंदे यांनी बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 4:04 am

Web Title: former bjp minister ram shinde blame radhakrishna vikhe patil for defeat zws 70
Next Stories
1 जिल्हा परिषदांमधील भाजपच्या सत्तेला हादरा देण्याची खेळी
2 पीएमसी बँक घोटाळा : पाच आरोपींविरोधात आरोपपत्र
3 बालनाटकांना विषयांची मर्यादा
Just Now!
X