जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निमित्तामुळे भाजपाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही उपस्थित दर्शवली होती. मात्र, व्यासपीठ हाऊसफूल असल्यामुळे त्यांना जागा मिळाली नाही. त्यामुळे सोमय्यांना संपूर्ण कार्यक्रम व्यासपीठ आणि खुर्च्या यांच्यामध्ये असलेल्या पायऱ्यांजवळ बसून पाहावा लागला. सोम य्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोमय्या समर्थकांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी भाजपावर तोंडसूख घेतले आहे.

ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये रविवारी भाजपतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सुत्रचंचालकांनी सोमय्या यांना व्यसपीठावर येण्याची विनंती केल्याची प्रथमदर्शींनी सांगितले. मात्र, अनेक विनवण्या करूनही सोमय्या व्यासपीठावर येत नसल्याचे पाहून शो मस्ट गो ऑन म्हणत कार्यक्रम पुढे रेटला. दरम्यान, यासंदर्भात सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना जे. पी. नड्डा म्हणाले, जम्मू-काश्मीरला अन्न, दळणवळण आणि सुरक्षा अशा सुविधा द्यायच्या पण, भारतीयांना जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकत्वाचा दर्जा दिला जाणार नाही, अशी तेथील नेत्यांची इच्छा होती. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० लागू करण्यासाठी तत्कालीन कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तयार नव्हते. मात्र नेहरूंच्या चुकीमुळे लागू झालेल्या या कलमामुळे तेथील जनतेवर आजपर्यंत अन्याय झाला, असा दावाही नड्डा यांनी केला. तसेच जम्मू-काश्मीर हे भारताचे राज्य म्हणून ओळखले जावे, अशी महाराजा हरिसिंग यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवली नव्हती. तरीही अनुच्छेद ३७० लागू करून जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. हे कलम म्हणजे तात्पुरती व्यवस्था होती. मात्र ही कायमस्वरूपी व्यवस्था असल्याचे भासविले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छाशक्ती आणि गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती या जोरावर हे रद्द करण्यात यश आले. या निर्णयामुळे आता तेथील जनतेवरील अन्याय दूर करण्याचे काम सरकारने केले आहे, असे नड्डा यांनी सांगितले.