हस्तक डी के राव याला अटक; मुख्य प्रवर्तकाला ४० कोटी देण्याचे फर्मान

सायन कोळीवाडय़ातील झोपु योजनेवर संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनला विशेष रस होता. बाली येथून अटक होण्याच्या दोनच दिवसांआधी राजनने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मुख्य प्रवर्तकाला ४० कोटी आणि त्याच्या टोळीला १० कोटी बांधकाम व्यावसायिकाने द्यावेत, असा हुकूम सोडला होता. विशेष म्हणजे आधीच्या बांधकाम व्यावसायिकाने या प्रकल्पातून अंग का काढले, कोणासोबत वाद घडला, मी त्यात तोडगा काढतो, असेही राजनने सुचवले होते. मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी केलेल्या कारवाईतून ही माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी राजनचा अत्यंत विश्वासू हस्तक मानल्या जाणाऱ्या रवी मल्लेश व्होरा ऊर्फ डी के राव याला गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागाने धारावीतील राहत्या घरून अटक केली. तब्बल तीन वर्षे मेहनत करून सुमारे एक हजार सभासद म्हणजेच रहिवाशांना तयार करून हा प्रकल्प बांधकाम व्यावसायिकाला मिळवून देणारा सल्लागार या प्रकरणात तक्रारदार आहे. मोबदला म्हणून २ कोटी आणि २ फ्लॅट बांधकाम व्यावसायिकाने सल्लागाराला द्यावेत, असा व्यवहार ठरला होता. मात्र रावला हाताशी धरत बांधकाम व्यावसायिकाने मोबदला देणे टाळले. उलट ठार मारण्याची धमकी देत रावनेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, अशी तक्रार सल्लागाराने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना भेटून केली होती. त्यांनी या प्रकरणाचा तपास सीआययूकडे सोपवला. पोलिसांना रावचा गुन्ह्य़ातला सहभाग आढळलाच, पण राजनचाही या प्रकल्पातला रस लक्षात आला.

सध्या हा प्रकल्प अमृत गडा, धीरज गडा, भरत सोनी यांच्या सेजल बिल्डर्स या कंपनीकडून सुरू आहे. पूर्वी आकृती कंपनी हा प्रकल्प करत होती. प्रकल्पाचा मुख्य प्रवर्तक अण्णा दुराई याने प्रकल्प सुरू करून देण्यासाठी सेजल कंपनीकडे ५० कोटी रुपये मागितले. कंपनीने रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर झालेल्या बैठकीत दुराई ५० कोटींवर अडून होता. तेव्हा पेशाने बांधकाम व्यावसायिक आणि शिवसेना सोडून एका राष्ट्रीय पक्षात आलेल्या नेत्याचा अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पाटीलने राजन, राव यांच्याशी फोनवरून चर्चा सुरू केली. त्यात राजनने दुराईची बाजू घेत ४० कोटी दुराईला आणि १० कोटी टोळीला म्हणजेच ५० कोटी द्यावे लागतील, असे फर्मान सोडले. त्यानंतर दोनच दिवसांत राजनला अटक झाली.

राजनने या झोपु योजनेशी संबंधित काही व्यक्तींना फोनाफोनी केल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. राजनचा खंडणीच्या गुन्ह्य़ात सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. पुरावे हाती येताच राजनवर या प्रकरणीही गुन्हा दाखल होऊ  शकेल. दरम्यान, गुन्हे शाखेचे अधिकारी पाटीलचा शोध घेत आहेत. सेजल कंपनीच्या भागीदारांचीही चौकशी केली जाईल, असे गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.