काँग्रेसचे माजी नेते राजेंद्र गावित यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पालघर येथील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. इतकेच नाही तर चिंतामण वनगा यांच्या मुलाला अर्थात श्रीनिवास वनगा यांना जवळ केल्याने शिवसेनेलाही भाजपाने काटशह दिल्याची चर्चा रंगली आहे.

राजेंद्र गावित हे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री पद भुषवले आहे. पालघर पोटनिवडणूक राजेंद्र गावित लढवणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान गावित हे कोणत्याही पदासाठी पक्षात आलेले नाहीत. पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे गावित यांनी सांगितले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. असे असले तरीही राजेंद्र गावित यांना पालघर विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला. पालघरची निवडणूक भाजपा हरल्यास वनगांना वाइट वाटेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपाची ही खेळी काँग्रेससोबत शिवसेनेलाही टक्कर देणारी ठरली आहे असेच म्हणता येईल. श्रीनिवास वनगांच्याबाबतीत शिवसेनेने असे वागायला नको होते असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.