News Flash

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. मागच्या काही काळापासून ते आजारी होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते. त्यांच्याच कर्णधारपदाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

१९५८ साली मुंबईच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारे वाडेकर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. स्लीपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती.

अजित वाडेकर यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९६७ साली अर्जून आणि १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईत वाडेकर यांचा जन्म झाला. त्यांनी शिकून इंजिनिअर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण वाडेकर क्रिकेटपटू झाले. १९५८-५९ च्या सुमारास त्यांनी मुंबईकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १३ डिसेंबर १९६६ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

भारताकडून ३७ कसोटी सामने खेळताना त्यांनी ३१.०७ च्या सरासरीने २,११३ धावा केल्या. यात एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी २३७ सामन्यात १५ हजार ३८० धावा केल्या. यात ३६ शतके आणि ८४ अर्धशतकांचा समावेश होता. अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिल्यांदा १९७१ साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. ते भारताचे पहिले वनडे कर्णधार होते.

अजित वाडेकर यांची मुंबईच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर लगेचच १९७१ साली त्यांची भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वानाथ, फारुख इंजिनिअर, बिशनसिंग बेदी, प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन असे एकाहून एक सरस खेळाडूंनी भरलेल्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले.

१९७१ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी विजयाची चव चाखली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या बलाढय संघांना त्यांच्या भूमीत पराभूत करण्याची किमया साधली. १९७० च्या दशकात भारताने वेस्ट इंडिजमध्ये पाच कसोटी सामने जिंकले. १९७२-७३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडवर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला.

एकदिवसीय क्रिकेटमधील अजित वाडेकर भारताचे पहिले कर्णधार होते. पहिल्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी ६७ धावा केल्या. ते अवघे दोन वनडे खेळले. त्यात ८१.११ च्या स्ट्राईक रेटने त्यांनी ७३ धावा केल्या. १९७४ साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला त्यावेळी वाडेकर कर्णधार होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही वाडेकरांनी भारतीय क्रिकेटला आपले योगदान दिले. १९९० च्या दशकात मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार असताना ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा वेगवेगळया भूमिका बजावणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये त्यांचा समावेश होतो. वाडेकर यांच्या आधी लाला अमरनाथ आणि चंदू बोर्ड या दोन खेळाडूंनीच इतक्या वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 10:55 pm

Web Title: former indian captain ajit wadekar passes away
Next Stories
1 Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत अजिंक्यला डावलून अश्विनला कर्णधारपद मिळण्याची शक्यता
2 Asian Games 2018 Blog : सुशील कुमार प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देईल?
3 ‘साहेबां’च्या भूमीत टीम इंडियाने फडकवला तिरंगा…
Just Now!
X