अमली पदार्थाची तस्करी

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी साजी मोहन यांना अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवत १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. १० वर्षांपूर्वी या प्रकरणी साजी मोहन यांना अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने साजी मोहन यांच्यासोबत त्यांचा चालक आणि हरयाणा येथील पोलीस हवालदार राजेशकुमार कटारिया यालाही दहा वर्षांची शिक्षा सुनावली. मोहन यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी क्षेत्रीय संचालक आणि अंमलबजावणी संचालनालयाचे सहसंचालक म्हणून काम पाहिले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मोहन आणि कटारिया यांच्याविरोधात ४० साक्षीदार तपासले. शिवाय तस्करीप्रकरणी मोहन आणि अमली पदार्थ दलालांमधील संभाषणाच्या ध्वनिफितीही पोलिसांनी पुरावा म्हणून सादर केल्या होत्या. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोहन यांच्याकडून १२ किलोगॅ्रम अमली पदार्थ हस्तगत गेले होते. या अमली पदार्थाची जम्मू आणि काश्मीरमार्गे तस्करी केली जाणार होती. चंडीगड येथे अमली पदार्थ नियंत्रण विभागात क्षेत्रीय संचालक म्हणून कार्यरत असताना जप्त केलेल्या अमली पदार्थाच्या साठय़ापैकी ५० टक्के साठा मोहन यांनी चोरला होता. तसेच चोरलेले अमली पदार्थ मोहन हे मुंबईसह देशातील महत्त्वाच्या शहरांतील अमली पदार्थ तस्करांना विकत असत, असा आरोप त्यांच्यावर होता.