लार्सन अँड टुब्रो (L & T) या उद्योग समूहाचे माजी संचालक यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांचे आज मुंबईत निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी या उद्योग समूहाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

मुंबईतील सिडनहॅम कॉलेजातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. त्यानंतर ते सीए आणि एलएलबी झाले. पुढे मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर दिल्ली, कोलकाता या महानगरांमध्येही त्यांनी काम केले.

सन १९७४ मध्ये अकाउंट सुपरवाइझर म्हणून ते ‘एल अँड टी’मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर एक-एक पायरी चढत ते ‘एल अँड टी’ समूहाच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदापर्यंत पोहोचले. त्यानंतर १९९० मध्ये ते कंपनीचे महाव्यवस्थापक आणि त्यानंतर १९९५ मध्ये ‘एल अँड टी’ समूहाचे संचालक बनले.

दरम्यान, ६ डिसेंबर २०११ रोजी देवस्थळी ‘एल अँड टी’ मधून मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. ‘एल अँड टी फायनान्स होल्डींग’ च्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी असताना त्यांनी शेअर बाजारात कंपनीची नोंदणी केली. २०१७ मध्ये या कंपनीतून निवृत्त झाले. ‘एल अँड टी’चे ते विश्वस्तही होते.

निवृत्तीनंतर स्विकारले समाजकार्य

निवृत्तीनंतर देवस्थळी यांनी समाजकार्यातही मोठा हातभार लावला. निराधार ज्येष्ठ व्यक्तींची त्यांनी पत्नी लीना यांच्यासह सेवा केली त्यासाठी खोपोलीत ‘चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास’ या संस्थेची स्थापना करुन ते पूर्ण समर्पित भावनेने यशस्वीपणे चालवले.