ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी लोकसभेची आगामी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपले शरीर व मन अजून थकले नसल्याने पक्षाचे काम आपण करतच राहणार आहोत, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नाईक यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे तब्बल ५३ वर्षांची आहे. गेल्या ३५ वर्षांत १० निवडणुका लढविल्या. त्यानंतर आता मात्र आगामी निवडणूक न लढविता केवळ समाजकार्य आणि पक्षकार्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरीच्या शोधात मुंबईला आल्यावर १९६० पासून जनसंघाचे कार्य, १९७८ मध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक, सलग तीनदा विजय, १९८९ पासून उत्तर मुंबईतून सलग पाच वेळा खासदार म्हणून नाईक निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियममंत्रिपदाचे काम पाहताना घरगुती गॅससाठीची एक कोटी दहा लाख ग्राहकांची प्रतीक्षा यादी संपवून सर्वाना कनेक्शन देण्यात आली.   दोन वेळा झालेला पराभव पचवून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कुष्ठपीडितांच्या संघटनेसाठी ते काम करीत राहिले. ‘आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था’ या डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे ते सध्या अध्यक्ष आहेत. कर्करोगाशी सामना करून बरे झालेल्या नाईक यांचे वय सध्या ८० आहे.