शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमवला, पण ते सदैव आमच्या हृदयात राहतील. अटलजी अमर आहेत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उद्धव ठाकरे आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० ते १ दरम्यान पार्थिव भाजपा केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी एक ते दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी राजघाटवर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज एम्स रूग्णालयात निधन झाले. साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहे.