अंबानी धमकी-मनसुख हत्या प्रकरणांत सहभागाचा ‘एनआयए’चा दावा

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली. स्फोटके पेरणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणांत शर्मा यांच्या सहभागाचे पुरावे आढळल्याचा दावा ‘एनआयए’ने न्यायालयात केला.

या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या अटकेनंतर ‘एनआयए’ने या आठवड्यात तपासाचा वेग वाढवला. आठवड्याच्या सुरुवातीलाच मनसुख हत्येत प्रत्यक्ष सहभागप्रकरणी संतोष शेलार, आनंद जाधव या दोन तरुणांना लातूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅली येथून शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले.

या गुन्ह्यांतील शर्मा यांचा सहभाग स्पष्ट करणारे थेट, परिस्थितीजन्य, तांत्रिक पुराव्यांआधारे त्यांच्याकडे रात्रभर चौकशी करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. याच सुमारास ‘एनआयए’च्या अन्य एका पथकाने सतीश ऊर्फ विकी बाबा आणि मनीष सोहनी या दोन आरोपींनाही अटक के ली.

राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात शर्मा, शेलार यांची नावे पुढे आली होती. विशेष न्यायालयानेही गुरुवारी या दोघांच्या अटके ला इतका विलंब का, असा प्रश्न ‘एनआयए’ला के ला. नावे पुढे आली असली तरी अटक करण्याइतके पुरावे हाती आले नव्हते. ते मिळताच कारवाई के ल्याचे ‘एनआयए’च्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

‘एनआयए’च्या तपासात शर्मा यांच्या संशयास्पद हालचाली पुढे आल्या होत्या. मनसुख यांच्या हत्येच्या तीन दिवस आधी शर्मा मुंबई पोलीस आयुक्तालयात उपस्थित होते. मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यासह त्यांनी मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. ही बैठक अनेक तास चालली. त्यानंतर ते राज्य पोलीस दलातील अतिरिक्त महासंचालकास भेटले. याशिवाय पश्चिाम उपनगरांत आरोपींच्या बैठकीत ते उपस्थित होते. याच बैठकीत हत्येचा कट आखला गेला, अशी माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती.

शेलार-शर्मा निकटवर्तीय

या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला, झोपु प्रकल्पातून इमारती बांधण्याचे कं त्राट घेणारा शेलार हा शर्मांचा निकटवर्तीय मानला जातो. निवृत्तीच्या तोंडावर २०१९मध्ये पोलीस दलाचा राजीनामा देऊन शिवसेनेत दाखल झालेले शर्मा हे गेल्या वेळी नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढले. संपूर्ण प्रचाराच्या कालावधीत शेलार त्यांच्यासोबत होता, अशी माहिती ‘एनआयए’ला मिळाली. मात्र, अटके नंतर या गुन्ह््यांतील प्रमुख आरोपी सचिन वाझे यांच्याशी काहीच संबंध नाही, शेलार याला ओळखत नाही, असा पवित्रा शर्मा यांनी न्यायालयात घेतला. प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी शर्मा यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी ‘एनआयए’ने छापा घातला तेव्हा त्यांची शेलारसोबतची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून पसरली.

’मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सर्व पुरावे नष्ट करण्यात वाझेंबरोबर शर्माही सहभागी होते, असे ‘एनआयए’च्या वकिलाने न्यायालयात सांगितले.

’दोन्ही गुन्ह्यांतील सर्व आरोपी वाझे, शर्मा यांच्या संपर्कात होते. सर्व आरोपींना शर्मा यांनी पैसे पुरवले. मनसुख यांच्या हत्येसाठी वापरलेली तवेरा गाडी आरोपी शेलारची आहे.

’वाझे यांनीच ४ मार्चच्या रात्री मनसुख यांच्याशी संपर्क साधून घराबाहेर बोलावले. आरोपी शेलार, जाधव, मनीष, सतीश उपस्थित असलेल्या गाडीत मनसुख यांना बसण्यास सांगितले.

’मनसुख या गाडीत बसताच चौघांनी त्यांची हत्या के ली, असा दावाही ‘एनआयए’ने के ला. न्यायालयाने शर्मा यांच्यासह अन्य दोन आरोपींना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.