मुंबई : ज्येष्ठ वैदर्भीय रंगकर्मी आणि नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांचे सोमवारी सकाळी दिल्ली येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी आहे. अकोला येथे ‘रसिकाश्रय’ संस्थेच्या माध्यमातून जाधव यांनी रंगभूमीसाठी रचनात्मक कार्य केले, नाटय़प्रयोग केले, नाटय़चळवळ उभारली.
राम जाधव हे २०११ साली रत्नागिरी येथे झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष होते. तसेच रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. जाधव हे नाटय़क्षेत्रातील चालते-बोलते विद्यापीठ असल्याची भावना रंगकर्मीमध्ये होती. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नाटकाशी संबंधित अनेक पदे मिळवली. अनेक विद्यार्थी घडवले.
मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जाधव हे खामगावला शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते. त्यांनी रेल्वेतही नोकरी केली. आव्हानांना भिडणे हा जाधव यांचा मूळ स्वभाव होता. पन्नास वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह करून पत्नीला घेऊन जाधव अकोल्याला गेले असता उसळलेल्या जनक्षोभाचा त्यांनी सामना केला. त्यानंतर समवयस्क मित्रांबरोबर त्यांनी ‘रसिकाश्रय’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी बसवलेल्या अनेक नाटकांनी मुंबई, पुणे येथे धडक द्यायला सुरुवात केली आणि राज्यभरातील नाटय़रसिकांचे लक्ष वेधून घेतले. विदर्भामध्ये हौशी रंगभूमीसाठी त्यांनी झोकून दिले. दरवर्षीच्या राज्य नाटय़ स्पर्धेत त्यांच्या नाटकाला कोणते ना कोणते बक्षीस मिळत गेले. त्यांना व्यावसायिक रंगभूमीसाठीही विचारणा झाली होती. पण हौशी रंगभूमीवर प्रेम असल्याने त्यांनी तेथेच मुख्यत्वे योगदान दिले.
सर्वाचे मामा
वयाच्या ऐंशीव्या वर्षांपर्यंत ते सतत रंगमंचावर कार्यरत होते आणि याही वयात ‘संक्षिप्त नटसम्राट’सारख्या पल्लेदार संवाद असलेल्या नाटकाचे प्रयोग करीत राहिले. नाटय़क्षेत्रात ते मामा म्हणून परिचित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 3:47 am